परग्रहावरील लोक पृथ्वीवर येऊन गेले असतील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 04:36 AM2018-12-08T04:36:32+5:302018-12-08T04:37:16+5:30
परग्रहावर जीवसृष्टीचे अस्तित्व असण्याची शक्यता नासाच्या एका शास्त्रज्ञाने व्यक्त केली आहे.
वॉशिंग्टन : परग्रहावर जीवसृष्टीचे अस्तित्व असण्याची शक्यता नासाच्या एका शास्त्रज्ञाने व्यक्त केली आहे. तेथील लोक म्हणजे एलियन्स पृथ्वीवर येऊनही गेले असतील; पण ते आपल्याला समजले नसेल, असेही त्याने म्हटले आहे.
आपल्या सूर्यमालेबाहेर जे असंख्य ग्रह, तारे आहेत. त्यावर जीवसृष्टी आहे का, याचा खगोलशास्त्रज्ञ अथक शोध घेत आहेत. परग्रहावरील माणसे पृथ्वीवर येऊन गेल्याचे अनेक जण सांगतात. त्याचे काही पुरावेही देतात; पण त्यांच्या अस्तित्वाबद्दल ठोस माहिती हाती लागलेली नाही. या माणसांवर आधारित अनेक कथा-कादंबऱ्या लिहिण्यात आल्या. चित्रपटही निघाले; पण ते काल्पनिक सदरात मोडणारे आहेत. नासा रिसर्च सेंटरमधील शास्त्रज्ञ सिल्वानो कोलोम्बानो यांनी एका शोधनिबंधात म्हटले आहे की, पृथ्वीवरील माणसांची परग्रहावरील माणसांविषयी जी कल्पना आहे त्यापेक्षा ते पूर्णपणे वेगळे दिसत असावेत. ही माणसे अधिक हुशार तसेच आकाराने सूक्ष्मही असू शकतात. (वृत्तसंस्था)
>‘त्यांचा’ इतिहास प्राचीन?
नासाचे शास्त्रज्ञ सिल्वानो कोलोम्बानो यांनी म्हटले आहे की, परग्रहावरील माणसांबाबत आपल्या ज्या संकल्पना आहेत त्यात काही बदल केले तर त्यांचा नव्या दृष्टिकोनातून शोध घेता येईल. पृथ्वीवरील मानवी संस्कृतीचा योग्य विकास खºया अर्थाने १० हजार वर्षांपूर्वी सुरू झाला. माणूस वापरत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाला ५०० वर्षांपूर्वीपासून प्रारंभ झाला. आपल्या मानवी संस्कृतीच्या इतिहासापेक्षा परग्रहांवरील माणसांच्या अस्तित्वाचा इतिहास आणखी प्राचीन असू शकेल.