मोदींच्या पाक भेटीने सारेच चकित
By admin | Published: December 26, 2015 03:35 AM2015-12-26T03:35:07+5:302015-12-26T09:01:37+5:30
कमालीची गुप्तता राखत आणि भारत व पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांना पुरता गुंगारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काबूलहून थेट दिल्लीत परतण्याऐवजी शुक्रवारी राजकीय सांताक्लॉजसारखे
Next
>लाहोर : कमालीची गुप्तता राखत आणि भारत व पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांना पुरता गुंगारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काबूलहून थेट दिल्लीत परतण्याऐवजी शुक्रवारी राजकीय सांताक्लॉजसारखे अचानक पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर अवतरले. अमेरिकी गुप्तचरांपासून भारत-पाकिस्तानातील राजकीय गोटात या आकस्मिक दौऱ्याचा थांगपत्ता नव्हता. सरहद्दीवरील चकमकींपासून काश्मीरच्या प्रश्नापर्यंत पाकिस्तानशी खडाजंगी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची आलिंगन भेट अनेकांसाठी धक्कादायक ठरली. पाकिस्तानला अशा पद्धतीने जाऊन मोदी यांनी सुरक्षेच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण केल्याची भावना भारतातील विरोधी पक्ष व्यक्त करीत असतानाच पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी या भेटीचे स्वागत केले आहे. तूर्तास या आकस्मिक भेटीचा अन्वयार्थ लावण्यात उभय देशांच्या बरोबरीने अवघे जग गुंगले आहे. या धक्कातंत्राचा वापर करणारे पंतप्रधान मोदी रात्रीच दिल्लीला परतले आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांना ९१व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.
गेल्या १० वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला पाकिस्तान दौरा आहे. ही भेट त्यांनी बर्थ डे डिप्लोमसीत बदलून टाकली. त्यासाठी त्यांनी नवाज शरीफ यांचा वाढदिवस निवडला; शिवाय या दिवसाचे वेगळे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रालोआचे पहिले पंतप्रधान आणि अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म ख्रिसमसच्याच दिवशी १९२४ साली झाला. पाकिस्तानचे पितामह म्हणून समजल्या जाणाऱ्या दिवंगत बॅ. महम्मद अली जिना यांचाही जन्म २५ डिसेंबर १८७६ रोजी झाला होता. तर अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमिद करझाई यांचा जन्म २४ डिसेंबर १९५७ रोजी झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानभेटीत करझाई यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यापूर्वी झिया उल हक पाकिस्तानचे नेतृत्व करीत असताना भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी जयपूरला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा वापर डिप्लोमसीसाठी केला होता.
पंतप्रधान मोदी हे भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने बोइंग ७३७ने येथे स्थानिक वेळेनुसार ४:२0ला पोहोचले. येथे त्यांचे शानदार स्वागत करण्यात आले.
त्यानंतर मोदी व नवाज शरीफ हे हेलिकॉप्टरने लाहोरजवळील शरीफ यांच्या रायविंद महल येथील निवासस्थानाकडे रवाना झाले. दरम्यान, या घडामोडींबाबत परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट केले आहे की, हा राजनेत्यासारखा व्यवहार आहे. आपल्या शेजारी राष्ट्रांशी असेच संबंध असायला हवेत. मोदी यांचा पाक दौर्याचा हा कार्यक्रम शुक्रवारीच ठरला, असा दावा पाकच्या विदेश विभागाचे प्रवक्ते काजी खलिलुल्ला यांनीही केला. आम्हाला भारतीय उच्चायुक्तांनी याबाबत माहिती दिली होती, असे ते म्हणाले.
विवाहाचे निमंत्रण... पंतप्रधान मोदी यांच्या पाकिस्तान दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली होती. विमानतळ परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीफ यांनी आपली नात मेहरुन्निसा हिच्या विवाहाचे निमंत्रण मोदी यांना दिले होते.
बिलावल भुट्टोंचे टिष्ट्वट
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि बेनझीर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचे पाकिस्तानात स्वागत. अशा भेटींमुळेच आपल्यातील प्रलंबित प्रश्न सुटू शकतील, असे ट्विट त्यांनी केले आहे.
रशियाचा दौरा पूर्ण करून काबूलमधील दिवसभराचा सरकारी कार्यक्रम झाल्यानंतर दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाहोर दौरा आश्चर्यकारकपणे ठरल्याचे सांगितले गेले.
ऐनवेळी ठरवला दौरा
पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाचे सचिव एजाज चौधरी यांनी सांगितले की, मोदी यांनी शुक्रवारी नवाज शरीफ यांना फोन केला आणि भारतात परतत असताना पाकिस्तानात थांबण्याचा विचार असल्याचे सांगितले. त्यावर तत्काळ शरीफ यांनी प्लीज कम, यू आर अवर गेस्ट असे सांगत मोदी यांना पाकमध्ये येण्यासाठी आग्रह केला.
अफगाणिस्तानचा दौरा पूर्ण करताना पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी मोदी यांनी ट्विट केले की, पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी आज भेट घेणार आहे. एका अन्य ट्विटमध्ये मोदी यांनी शरीफ यांना त्यांच्या ६६व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
मोदी आणि शरीफ यांची पॅरिसमधील चर्चाही पूर्वनियोजित नव्हती. यानंतरच उभय देशांनी चर्चा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
संबंध एवढे सुमधुर झाले काय? - काँग्रेस
मोदींनी आकस्मिक भेट देण्याजोगे आपले पाकिस्तानशी संबंध सुधारले आहेत काय? असे काँग्रेसचे प्रवक्ते अजय कुमार यांनी म्हटले. मोदींचे लाहोरला जाणे पूर्वनियोजित नव्हते. त्यामुळे हा दौरा निश्चितच हास्यास्पद आहे. त्यांच्या या निर्णयामुळे निश्चितच देशाच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम झाला असल्याचे माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी स्पष्ट केले.
नवाज शरीफ यांच्या जाती उमराह निवासस्थानामध्ये आयोजित भोजनावेळेस साग या नरेंद्र मोदींच्या आवडत्या डिशचा समावेश
नरेंद्र मोदींसाठी खास काश्मिरी चहा पेश करण्यात आला. साग, दाल आणि इतर सर्व शाकाहारी पदार्थ शुद्ध तुपात बनविण्यात आले होते.
पंतप्रधानांसह ११ जणांच्या शिष्टमंडळाची जाती उमराहला भेट. या सर्वांना ७२ तासांचा व्हिसा देण्यात आला होता.
पाकला भेट देणारे चौथे भारतीय पंतप्रधान
पाकिस्तानामध्ये पुढच्या वर्षी सार्क परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाण्याची शक्यता होती आणि त्याबद्दल चर्चाही सुरू होती. पण आजच्या अचानक पाकभेटीमुळे नवा इतिहास रचला गेला.
पाकिस्तानला भेट देणारे मोदी चौथे पंतप्रधान ठरले आहेत.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पाकिस्तानला १९५३च्या जुलै महिन्यात व त्यानंतर सप्टेंबर १९६०मध्ये भेट दिली होती. त्यानंतर २८ वर्षांमध्ये पाकिस्तानला भारतीय पंतप्रधानांनी भेट दिलेली नव्हती. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी १९८८ आणि ८९ अशा सलग दोन वर्षांमध्ये पाकिस्तानला भेट दिली. त्यानंतर १९९९ साली अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानला भेट दिली होती, त्या वेळेस त्यांचा दिल्ली-लाहोर बसचा प्रवास गाजला होता. २००४च्या जानेवारी महिन्यामध्ये त्यांनी पाकिस्तानला पुन्हा भेट दिली. त्यानंतर २००४ सालीच पंतप्रधानपदी आलेले डॉ. मनमोहन सिंग पाकिस्तानला भेट देतील अशी अपेक्षा होती.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म फाळणीपूर्व पंजाबच्या आणि सध्या पाकिस्तानात असलेल्या गाहमध्ये झाला असल्यामुळे ते पाकिस्तानला भेट देतील अशी चर्चा होती, मात्र त्यांच्या
१० वर्षांच्या कार्यकाळात त्यांना भेट देणे विविध कारणांमुळे शक्य झाले नाही.