'काळा पैसा व दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र येणे आवश्यक'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 04:54 AM2018-12-02T04:54:54+5:302018-12-02T04:55:07+5:30
काळ्या पैशांविरोधात लढण्यासाठी जगातील सर्व देशांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
ब्युनस आयर्स : काळ्या पैशांविरोधात लढण्यासाठी जगातील सर्व देशांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. येथे शुक्रवारी सुरू झालेल्या जी-२० शिखर परिषदेत भारताचे नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेतली.
परिषदेतही जागतिक मुद्यांवर चर्चा करताना दहशतवाद व आर्थिक गुन्हे ही जगासमोरील दोन सर्वांत मोठी आव्हाने असून, त्याचा सर्वांनाच सामना करावा लागत आहे, असे मोदी म्हणाले.
परिषदेच्या अनौपचारिक बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी दहशतवाद व आर्थिक गुन्ह्यांविरोधात सर्वच राष्ट्रांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त
केली.
मोदी यांनी रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन, जर्मनीच्या चॅन्सलेर एंजेला मार्केल यांची भेट घेतली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे प्रमुख शिंजो आबे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. त्यानंतर तिघांनी एक छोटेसे निवेदनही केले.
त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारत व अमेरिका यांचे संबंध पूर्वीपेक्षा सुधारले असून, यापुढे परस्परांत सहकार्य कायम राहील. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे
यांनीही त्यास दुजोरा दिला.
(वृत्तसंस्था)
>‘जय’ म्हणजे जपान, अमेरिका, इंडिया
तिघे व्यासपीठावर आल्यानंतर मोदी म्हणाले की, जपान, अमेरिका व इंडिया (भारत) यांच्या आद्याक्षरांतून ‘जय’ म्हणजेच सक्सेस असा अर्थ निघतो. त्यामुळे आम्ही तिघे यशासाठी एकत्र येत आहोत.
संयुक्त राष्ट्रे व सर्व आंतरराष्ट्रीय संस्थांनी विकसनशील देशांच्या हितासाठी आवाज उठवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.