2000 चे 2020 दरम्यान मिळवलेल्या सर्व पदव्या अवैध, तालिबानचा अजब निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 12:18 PM2021-10-05T12:18:57+5:302021-10-05T12:19:14+5:30
काबुलमध्ये विद्यापीठाच्या प्राध्यापकांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान तालिबानने ही घोषणा केली.
काबुल:अफगाणिस्तानाततालिबान सत्ते आल्यापासून अनेक गोष्टींमध्ये बदल झाला आहे. काही दिवसांपूर्वी तालिबानने महाविद्यालयीन उच्च शिक्षणापेक्षा मदरशामधील शिक्षण मोठं असल्याचं म्हटलं होतं. तसेच, कमी शिकलेल्या एका व्यक्तीची विद्यापीठाच्या उच्च पदावर नियुक्ती केली होती. आता परत एकदा मुर्खपणाचा निर्णय घेतला आहे.
अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने आणखी एक मोठा हुकूम जारी केला आहे. तालिबानने गेल्या 20 वर्षात मिळवलेल्या पदव्यांना अवैध घोषित केलं आहे. तालिबानने जारी केलेल्या हुकूमानुसार, 2000 ते 2020 दरम्यान अफगाणिस्तानमध्ये हायस्कूल ते पदवीपर्यंतच्या पदवीला कोणतंही महत्त्व नसेल.
स्थानिक माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, गेल्या वीस वर्षात मिळवलेल्या पदव्या अवैध असतील. तालिबान सरकारमधील उच्च शिक्षणाचे कार्यवाह अब्दुल बाकी हक्कानी यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये विद्यापीठाच्या प्राध्यापकांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान ही घोषणा केली. त्यांनी हे स्पष्ट केले की, गेल्या वीस वर्षांत मिळवलेल्या सर्व हायस्कूल ते बॅचलर डिग्रीचा काही उपयोग नसेल. त्यामुळे आता गेल्या 20 मिळवलेल्या शिक्षणाला आणि पदव्यांना आता अफगाणिस्तानात कोणतंही महत्व नसणार आहे.