"लष्करप्रमुखांसह सर्वांचा लोकशाहीवर विश्वास"; पाकिस्तानमध्ये लष्करी राजवट लागू करण्यास इन्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 09:28 AM2023-05-14T09:28:12+5:302023-05-14T09:29:31+5:30
इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर)चे महासंचालक मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांची ही टिप्पणी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या अटकेनंतर चार दिवस घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आलेली आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर निर्माण झालेले राजकीय संकट व बिघडती कायदा-व्यवस्था पाहता देशात लष्करी राजवट लागू करण्याच्या शक्यतेचा पाकिस्तानी लष्कराने इन्कार केला आहे. लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीरसह सर्व लष्कराचा लोकशाहीवर विश्वास आहे, असेही यावेळी सांगितले.
इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर)चे महासंचालक मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांची ही टिप्पणी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या अटकेनंतर चार दिवस घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आलेली आहे.
या कालावधीत रावळपिंडीमध्ये जनरल मुख्यालयासह लष्करी प्रतिष्ठानांनाही लक्ष्य करण्यात आले होते. चौधरी यांनी सांगितले की, देशात लष्करी राजवट लागू करण्याचा प्रश्नच नाही. लष्कराचे ऐक्य अतूट आहे व लष्कर देशाचे स्थैर्य व सुरक्षेसाठी काम करीत राहील. पाकिस्तानी लष्करात दुही माजवण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहील. लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या नेतृत्वात लष्कर एकजूट राहील.
माझ्या अटकेसाठी लष्करप्रमुखच जबाबदार - इम्रान खान
- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अखेर शनिवारी सकाळी आपल्या लाहोर येथील निवासस्थानी दाखल झाले. अनेक प्रकरणांमध्ये जामीन मिळाला असला तरी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना न्यायालयाच्या परिसरातच थांबावे लागले होते. दरम्यान, आपल्या अटकेसाठी लष्करप्रमुख असीम मुनीर हेच जबाबदार आहेत, असा आरोप इम्रान खान यांनी केला.
- इस्लामाबाद उच्च न्यायालयाने खान यांना शुक्रवारी भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात दोन आठवड्यांसाठी जामीन देताना सोमवारपर्यंत कोणत्याही प्रकरणात अटक करण्यावर स्थगिती दिली.
- कडक सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयात नेलेल्या ७० वर्षीय इम्रान खान यांना उच्च न्यायालयाच्या तीन वेगवेगळ्या पीठांनी दिलासा दिला होता. इम्रान खान लाहोर येथील जमां पार्कमधील निवासस्थानी दाखल होताच कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
- सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या मागणीवर अडून बसलेले खान यांच्यावर देशभरात १२० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.