युद्ध थांबविण्यासाठी शक्य ती सर्व मदत; रशिया दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतिन यांना ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 02:21 PM2024-10-23T14:21:35+5:302024-10-23T14:22:20+5:30
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी बीजिंगमध्ये या कराराविषयी माहिती दिली.
कझान (रशिया) : रशिया-युक्रेन संघर्षावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याची गरज प्रतिपादित करून यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भारताची तयारी असल्याचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान मोदींनी ही हमी दिली.
१६व्या ‘ब्रिक्स’ परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी कझान येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी पुतिन यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. या भागात तातडीने शांतता आणि स्थैर्य निर्माण होण्यासाठी भारताचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे माेदी यांनी नंतर दूरचित्रवाहिनीवर बोलताना स्पष्ट केले.
गेल्या तीन महिन्यांत आपला हा दुसरा रशिया दौरा असल्याचे नमूद करून दोन्ही देशांतील घनिष्ठ संबंधांचे हे द्योतक असल्याचे मोदी म्हणाले. मानवतावादालाच भारताचे प्रथम प्राधान्य असल्याचे नमूद करून भावी काळात यासाठी हवे ते सर्व सहकार्य करण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या जुलैमध्ये मास्कोमध्ये झालेल्या चर्चेमुळे भारत-रशियात सहकार्य अधिक बळकट झाले असल्याचे मोदी म्हणाले.
‘ब्रिक्स’अंतर्गत मदतीस कायम प्राधान्य
nनवी दिल्ली : जागतिक विकासाच्या मुद्द्यांशी संबंधित चर्चेसाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून उदयास आलेली ‘ब्रिक्स’अंतर्गत सदस्य देशांतील घनिष्ठ सहकार्याला भारत कायम महत्त्व देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
n‘ब्रिक्स’ गटाच्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियातील कझानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, या परिषदेसाठी चीनचे नेतेही रवाना झाले आहे.
रशियन कृष्णभक्तांनी गायले भजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी ब्रिक्स परिषदेसाठी कझान येथे आगमन झाल्यावर इस्कॉनच्या कृष्ण भक्तांनी संस्कृत स्वागत गीत, रशियन नृत्य आणि कृष्ण भजनाने त्यांचे स्वागत केले.
हॉटेल कॉर्स्टनमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. ते भारतीय तिरंगा घेऊन घोषणा देत होते. अनेक जण मोबाइलसोबत सेल्फी घेतानाही दिसले.
भारतीय समुदायाने आपल्या कर्तृत्वाने जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.
‘ब्रिक्स’चे महत्त्व का?
ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे या संघटनेचे मुख्य सदस्य देश असून जागतिक अर्थव्यवस्थेच्या एक चतुर्थांश भागाचे हे देश प्रतिनिधित्व करतात.
या मुद्द्यांवर भर
युद्ध आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य राष्ट्रांना आपली शक्ती आणि एकी दाखवण्याच्या दृष्टीने रशियाने आयोजित केलेल्या या ब्रिक्स परिषदेचे वेगळे महत्त्व आहे.
लडाखबाबत चीनशी करारावर सहमती
ब्रिक्स परिषदेनिमित्त रशिया दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता पाहता पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर २०२० मध्ये निर्माण झालेल्या झालेल्या वादावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने अपेक्षित कराराची चीनने पुष्टी केली आहे. चीनच्या परराष्ट् मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी बीजिंगमध्ये या कराराविषयी माहिती दिली.
- २००६ मध्ये ब्राझील, रशिया, भारत चीन यांच्या सेंट पीटर्सबर्ग बैठकीनंतर ब्रिक्सची सुरुवात.
- २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेला यात समाविष्ट करून संघटनेच्या विस्तारावर सहमती.
- ०४ आणखी देश समाविष्ट. यात इजिप्त, इथिओपिया, इराण व संयुक्त अरब अमिरातीचा समावेश.