माझ्याविरोधातील आरोप खोटे आणि निराधार - विजय माल्ल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 05:53 PM2017-12-04T17:53:45+5:302017-12-04T19:19:15+5:30
भारतातील बँकांचे हजारो कोटींचे कर्ज थकवून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय माल्ल्याने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आणि निराधार असल्याचे माल्ल्याने म्हटले आहे.
लंडन - भारतातील बँकांचे हजारो कोटींचे कर्ज थकवून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय माल्ल्याने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आणि निराधार असल्याचे माल्ल्याने म्हटले आहे. भारतातून फरार झाल्यापासून माल्ल्या हा इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. तसेच माल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.
लंडनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना माल्ल्या म्हणाला की," मी पुन्हा एकदा सांगतो माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत. आता मला अजून काही सांगायचे नाही."
मनी लाँडरिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर विजय माल्ल्याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्याची सहा लाख 50 हजार पौंड्सच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. माल्याने विविध बँकांचे सुमारे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे.
#WATCH#VijayMallya says, I am not the decision maker. I will follow the proceedings, ahead of appearing before London's Westminster Court in connection with extradition case pic.twitter.com/adebdgf666
— ANI (@ANI) December 4, 2017
बँकांना कोट्यावधींचा गंडा घालून गेलेल्या विजय माल्याला भारताच्या स्वाधीन केले जावे, यासाठी भारत सरकारकडून गेल्या वर्षी ब्रिटेनकडे अर्ज करण्यात आला होता. याला ब्रिटेनकडून देखील सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला होता. यासंबंधीचा सर्व प्रक्रियांची सुरुवात देखील करण्यात येत आहे.
विजय माल्याने व्यवसायाच्या नावावर भारतातील बँकांकडून 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे सर्व थकीत कर्ज तसेच ठेऊन त्याने इंग्लंडला पलायन केले होते. त्यानंतर सीबीआय आणि इडीने केलेल्या कारवाईत माल्याची भारतातील कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. तसेच माल्याला फरार म्हणून घोषित करत त्यावर अजामीनपात्र अटक वॉरंट देखील जारी करण्यात आले आहे.