साहित्याचे पर्यायी नोबेल, असंतुष्ट बुद्धिवंतांची ‘न्यू अकॅडमी’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 04:48 AM2018-07-08T04:48:20+5:302018-07-08T04:48:52+5:30
‘रॉयल स्वीडिश अॅकॅडमी’ने यंदाच्या नोबेल साहित्य पुरस्काराची घोषणा बेमुदत पुढे ढकलल्यानंतर स्वीडनमधील १०० हून अधिक प्रमुख बुद्धिवंतांनी एकत्र येऊन पर्यायी नोबेल पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
स्टॉकहोम : एक प्रभावशाली सदस्य लैंगिक शोषणाच्या आरोपात गुरफटून वाद निर्माण झाल्याने नोबेल पुरस्कार देणाऱ्या ‘रॉयल स्वीडिश अॅकॅडमी’ने यंदाच्या नोबेल साहित्य पुरस्काराची घोषणा बेमुदत पुढे ढकलल्यानंतर स्वीडनमधील १०० हून अधिक प्रमुख बुद्धिवंतांनी एकत्र येऊन पर्यायी नोबेल पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
रॉयल स्वीडिश अकादमीच्या ’पक्षपात, उद्दामपणा व लैंगिक व्यभिचारा’चा निषेध करत १०७ मान्यवर लेखक, प्रकाशक, कलावंत व पत्रकारांनी एकत्र येऊन यासाठी ‘ न्यू अॅकॉडमी’ची स्थापना केल्याचे एका संयुक्त निवेदनाव्दारे जाहीर केले.
साहित्यासाठीचा पर्यायी नोबेल पुरस्कार १० लाख क्रोनर (सुमारे १,३० लाख डॉलर) असेल. यासाठी लोकवर्गणी व देणग्यांमधून निधी उभा केला जाईल. एरवी नोबेल साहित्य पुरस्काराची घोषणा होते तेव्हाच म्हणजे १४ आॅक्टोबर रोजी या पर्यायी पुरस्काराचा विजेता जाहीर केला जाईल व ज्या दिवशी सर्व नोबेल पुरस्कारांचे स्वीडनच्या राजांच्या हस्ते वितरण होते त्याच दिवशी (१० डिसेंबर) हा पुरस्कारही वेगळ््या कार्यक्रमात प्रदान केला जाईल. (वृत्तसंस्था)
स्वीडन हा जगातील सर्वाधिक लोकशाहीवादी, पारदर्शी आणि लैंगिक समानता पाळणारा देश असल्याने या देशाचा असा जागतिक तोडीचा साहित्य पुरस्कार असायलाच हवा.
- न्यू अकादमीचे निवेदन