अमेरिकेकडून कोरियन द्विपकल्पात बी-1बी बॉम्बवर्षाव करणारी लढाऊ विमानं तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2017 06:49 PM2017-07-30T18:49:15+5:302017-07-30T18:55:27+5:30
अमेरिकेनंही प्रत्युत्तरादाखल कोरियन द्विपकल्पात बी-1 बी ही बॉम्बवर्षाव करणारी लढाऊ विमानं तैनात केली आहेत.
सोल, दि. 30 - उत्तर कोरियानं काल पुन्हा एकदा आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी करून न्यूयॉर्कसह संपूर्ण अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर अमेरिकेनंही प्रत्युत्तरादाखल कोरियन द्विपकल्पात बी-1 बी ही बॉम्बवर्षाव करणारी लढाऊ विमानं तैनात केली आहेत. जपानचे संरक्षण मंत्री फुमियो किशिदा यांनी ही माहिती दिली आहे. जपानमधल्या एका संमेलनात ते बोलत होते. ते म्हणाले, अमेरिकेच्या बॉम्बवर्षाव करणा-या लढाऊ विमानांसोबत जपाननंही मित्सुबिशी एफ 2 ही लढाऊ विमानं तैनात केली आहेत. उत्तर कोरियांनी युद्धासाठी उकसावल्यामुळेच उत्तरादाखल अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. किम जोंग उन यांच्या सरकारनं मेमध्येही छोट्या मिसाइलचीही चाचणी केल्यानंतर अमेरिकेनं बी-1बी बॉम्बवर्षाव करणारी विमानं तैनात केली होती. उत्तर कोरियाचा प्रश्न सोडवण्यासाठी चीननं हातावर हात ठेवून बसू नये, अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. ट्रम्प म्हणाले, मी चीनमुळे खूप निराश आहे. चीननं वार्तालापापेक्षा उत्तर कोरियाशी अमेरिकेचे संबंध सुधारण्यासाठी कोणताच प्रयत्न केला नाही. चीन ही समस्या चुटकीसरशी सोडवू शकत होता. मात्र आम्हीही ही समस्या तात्काळ निकालात काढणार आहोत. अमेरिका सहयोगी देशांच्या संरक्षणाखातर शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचंही ट्रम्प म्हणाले आहेत.
तर संपूर्ण अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता आम्ही प्राप्त केली असल्याचे कालच उत्तर कोरियाने म्हटले होते. उत्तर कोरियाने शुक्रवारी दुसऱ्यांदा बॅलेस्टिक मिसाइलचं परीक्षण केलं होतं. त्यातूनच उत्तर कोरियाने पुन्हा एकदा अमेरिकेला थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. दुसऱ्या आयसीबीएम परीक्षणामुळे आम्ही अमेरिकेतल्या कुठल्याही शहराला लक्ष्य करू शकतो. अमेरिकेसाठी हा धोक्याचा इशारा आहे, असे उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोग उन यांनी म्हणाले होते.
उत्तर कोरिया दहा हजार किलोमीटरच्या टप्प्यात हल्ला करू शकते. अमेरिकेत कुठेही हल्ला करण्याची ताकद उत्तर कोरियानं मिळवल्याचं मत या क्षेत्रातील विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, उत्तर कोरियाने दुसऱ्यांदा आयसीबीएम चाचणी घेतल्यानं चीनने उत्तर कोरियावर टीका केली आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे तणाव वाढणार असून, सर्व देशांनी शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्याची जबाबदारी सांभाळली पाहिजे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. उत्तर कोरिया संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाचा भंग करत असल्याचा आरोपही चीनने केला होता. रशिया, इराण आणि उत्तर कोरियाच्या विरोधात अधिक कडक निर्बंध लादण्याच्या ठरावाला अमेरिकी संसदेने मंजुरी दिल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात आली होती.