अॅमेझॉनच्या मालकाचे मित्राच्या पत्नीशीच प्रेमसंबंध? 455 कोटींच्या खासगी विमानातून भ्रमंती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 10:48 PM2019-01-11T22:48:05+5:302019-01-11T22:49:12+5:30
जगातील सर्वात श्रीमंत जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातमीने उद्योगविश्व ढवळून निघाले आहे.
वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातमीने उद्योगविश्व ढवळून निघाले आहे. मात्र, या घटस्फोटामागचे कारण पुढे येत असून अॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांचे माजी टीव्ही अँकरसोबत प्रेमसंबंध असल्याचा दावा अमेरिकी मॅग्झीन द एन्क्वायररने केला आहे.
25 वर्षे एकत्र राहिल्यानंतर जेफ बेजोस यांनी पत्नी मॅकेन्झी बेजोस हिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे माजी टीव्ही अँकरसोबतचे प्रेमप्रकरण असल्याचे समजते. लॉरेन सांचेज (49) असे या टीव्ही अँकरचे नाव असून तीनेही पती पॅट्रीक वाईटसेल याच्यापासून घटस्फोट घेतला आहे. वाईटसेल हे हॉलिवूड एजन्सी डब्ल्यूएमईचे सीईओ आहेत. जेफ बेजोस हे वाईटसेल यांच्यामार्फतच सांचेजला दोन वर्षांपूर्वी भेटले होते. ते दोघेही मित्र आहेत.
द एन्क्वायररने म्हटले आहे की, त्यांच्या चमूने बेजोस आणि लॉरेन सांचेज यांना गेल्या 4 महिन्यांपासून पाळत ठेवली होती. या युगुलाने या काळात खासगी विमानातून 5 राज्यांमध्ये 40 हजार मैल प्रवास केला आहे. याचे आपल्याकडे पुरवे असल्याचा दावाही या मॅग्झीनने केला आहे. हे खासगी जेट 455 कोटी रुपयांचे आहे.
या प्रेमप्रकरणाची बातमी गुरुवारीच प्रकाशित करण्यात येणार होती. यासाठी बेजोस यांच्या प्रतिनिधीकडे खुलासा मागण्यात आला होता. मात्र, हे कळताच बेजोस यांनी घटस्फोटाची घोषणा केल्याचा दावा करण्यात आला आहे.
द एन्क्वायरर हा मॅग्झीन हॉलिवूडमधील धक्कादायक बातम्या देण्यासाठी ओळखले जाते. मात्र, बेजोस यांच्या मागे ससेमिरा लावण्यामागे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हात असल्याचे बोलले जात आहे. कारण बेजोस वॉशिंग्टन पोस्टचेही मालक आहेत आणि ट्रम्प यांच्या विरोधात वॉशिंग्टन पोस्टमध्ये बातम्या छापून येत असतात. महत्वाचे म्हणजे द एन्क्वायररची पालक कंपनी अमेरिकन मिडीया इंकचे मालक डेव्हिड पेकर हे ट्रम्प यांचे चांगले मित्र आहेत.