कॅनडाच्या मंत्र्याला पगडी उतरवण्यास सांगितल्याबद्दल अमेरिकेने मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 11:40 AM2018-05-11T11:40:32+5:302018-05-11T11:40:32+5:30
कॅनडाच्या मंत्रिमंडळामध्ये शीख समुदायाचे अनेक प्रतिनिधी आहेत. कॅनडामध्ये भारतीय वंशाचे लोक बहुसंख्येने आढळतात.
वॉशिंग्टन- अमेरिकन वाहतूक सुरक्षा विभागाने कॅनडा सरकारमधील कॅबिनेट मंत्री नवदीप बैन्स यांची माफी मागितली आहे. नवदीप यांना गेल्या वर्षी डेट्राॅइट विमानतळावर पगडी उतरवण्याचे आदेश देण्यात आले होते. याबद्दल वाहतूक सुरक्षा विभागाने माफी मागितली आहे.
नवदीप बैन्स हे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळामध्ये विज्ञान, आर्थिक विकास खात्याचे मंत्री आहेत. २०१७ साली एप्रिल महिन्यात अमेरिकेतील डेट्रॉइट येथिल विमानतळावरुन प्रवास करताना सुरक्षा विभागाने तपासणीसाठी पगडी उतरवण्याचे आदेश दिलेे. मात्र धार्मिक कारणांमुळे आपण तसे करु शकत नाही असे बैन्स यांनी सांगितले काहीवेळातच बैन्स हे कोण आहेत आणि ते कोणत्या पदावर कार्यरत आहेत हे सुरक्षा विभागास समजताच त्यांनी बैन्स यांना तात्काळ पुढील प्रवासासाठी जाऊ दिले.
अशाप्रकारो भेदभाव होण्याची ही पहिलीच वेळ होती असे मत व्यक्त करुन बैन्स यांनी नाराजी व्यक्त केली होती. कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री ख्रिस्तिया फ्रीलँड यांच्या वाँशिंग्टनमधील अधिकाऱ्यांनीही कॅनडाचे या घटनेबाबतचे मत अमेरिकेच्या सुरक्षा विभागाकडे मांडले होते.