युक्रेनला अमेरिकेचा दणका, मदत रोखल्याने कोंडी; झेलेन्स्की म्हणाले, ट्रम्प वाद ‘दुर्दैवी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 07:11 IST2025-03-05T07:09:55+5:302025-03-05T07:11:48+5:30

अमेरिकेने युक्रेनला युद्धात आतापर्यंत ६५.९ अब्ज डॉलरची लष्करी मदत दिली.

america big blow to ukraine puts it in a dilemma by withholding aid | युक्रेनला अमेरिकेचा दणका, मदत रोखल्याने कोंडी; झेलेन्स्की म्हणाले, ट्रम्प वाद ‘दुर्दैवी’

युक्रेनला अमेरिकेचा दणका, मदत रोखल्याने कोंडी; झेलेन्स्की म्हणाले, ट्रम्प वाद ‘दुर्दैवी’

न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : युक्रेनला अमेरिकेकडून देण्यात येणारी लष्करी मदत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तात्पुरती स्थगित केली आहे. त्यांच्या या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली. यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्यासोबत झालेला वाद ‘दुर्दैवी’ असल्याचे सांगत आता अमेरिकेसोबत संबंध सुधारण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अमेरिकेसोबत युक्रेन खनिजांचा करार करण्याची शक्यता वाढली आहे.

अमेरिका युक्रेनला अमेरिका ८७२५ कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे व दारुगोळा यांची मदत करणार होती. पण ट्रम्प यांनी मदतीला स्थगिती दिल्याने युक्रेनला दणका बसला आहे. युक्रेन रशियाशी चर्चेस तयार आहे, याची डोनाल्ड ट्रम्प यांना खात्री पटत नाही, तोवर ही स्थगिती कायम राहणार आहे. अमेरिकेने युक्रेनला युद्धात आतापर्यंत ६५.९ अब्ज डॉलरची लष्करी मदत दिली.

युक्रेनचे सैनिक, नागरिक अमेरिकेवर संतापले

युक्रेनला देण्यात येणारी सर्व प्रकारची लष्करी मदत अमेरिकेने तात्पुरती थांबविली आहे, ही गोष्ट कळताच युक्रेनच्या सैनिक, नागरिकांनी संताप व्यक्त केला. युक्रेनच्या एका सैनिकाने सांगितले की, ट्रम्प यांच्या देशाची फसवणूक करतील अशी मी बांधलेली अटकळ खरी निघाली. युक्रेनमधील कायदेमंडळाचे सदस्य आणि परराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओलेक्झांद्र मिरेझको म्हणाले की, ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिका आता रशियाच्या बाजूने झुकल्याचे या निर्णयातून दिसते आहे. रशियाने घातलेल्या अटी युक्रेनने मान्य कराव्यात, असा अमेरिका आग्रह करत आहे. (वृत्तसंस्था) 
 

Web Title: america big blow to ukraine puts it in a dilemma by withholding aid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.