जागतिक अस्थिरता अन् अमेरिकेसोबत टॅरिफ वॉर; चीनच्या हाती लागला मोठा खजिना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 21:25 IST2025-03-05T21:24:57+5:302025-03-05T21:25:15+5:30
America-China Tarrif War : 'अमेरिकेला युद्ध हवे असेल, तर आम्ही तयार आहोत.'

जागतिक अस्थिरता अन् अमेरिकेसोबत टॅरिफ वॉर; चीनच्या हाती लागला मोठा खजिना
America-China Tariff War : अमेरिकेसोबत सुरू झालेल्या 'टॅरिफ वॉर'दरम्यान चीनच्या हाती मोठा खजिना लागला आहे. चीनने दोन मोठी तेलाची ठिकाणे शोधून काढली आहेत. या दोन तेलसाठ्यांमध्ये 180 दशलक्ष टन इतका तेल असल्याचा अंदाज आहे. जागतिक अस्थिरतेच्या परिस्थितीत तेलाचे साठे सापडणे चीनच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
चीनची सर्वात मोठी तेल शुद्धीकरण कंपनी सिनोपेकने सोमवारी या शोधांची घोषणा केली. कंपनीने सांगितले की, तेलाचे साठे ईशान्य चीनच्या बोहाई गल्फ बेसिन आणि जिआंगसूच्या पूर्व प्रांतातील सुबेई बेसिनमध्ये आढळले आहेत. चीनी मीडियानुसार, प्राथमिक मूल्यांकन दर्शविते की, दोन्ही ठिकाणांमध्ये दीर्घकाळ तेल उत्पादन करण्याची क्षमता आहे.
जीवाश्म इंधन अन् खनिजे शोधण्याची मोहीम
गेल्या काही काळापासून चीन देशभरात जीवाश्म इंधन, लिथियम, कोबाल्ट आणि दुर्मिळ पृथ्वी धातूंसह महत्त्वाच्या नैसर्गिक संसाधनांचे स्त्रोताचा शोध घेत आहे. याच प्रक्रियेदरम्यान चीनच्या हाती हे दोन मोठे साठे सापडले आहेत. या नैसर्गिक संसाधनांचा शोध घेण्यासाठी चीनने 2011 मध्ये द मिनरल एक्सप्लोरेशन ब्रेकथ्रू स्ट्रॅटेजी सुरू केली, ज्याचा उद्देश देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत करणे हा होता.
चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाने गेल्या आठवड्यात एका पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या चार वर्षांत या मोहिमेत वेगाने प्रगती झाली आहे, परिणामी 10 नवीन तेल क्षेत्रे सापडली आहेत. यापैकी प्रत्येकाकडे 100 दशलक्ष टनांहून अधिक तेलाचे साठे आहेत. 19 नैसर्गिक वायू क्षेत्रेही सापडली आहेत, ज्यात 100 अब्ज घनमीटरपेक्षा जास्त गॅसचा साठा आहे. या मोहिमेअंतर्गत युरेनियमचे 10 मोठे साठेही सापडले आहेत.
चीनला हे तेलाचे साठे अशावेळी सापडले आहेत, जेव्हा अमेरिकेने चीनवर शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी चीनवर 10% शुल्क लावला आहे, तर प्रत्युत्तरात चीनदेखील अमेरिकन सामानांवर 10-15 टक्के शुल्क लादण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेतील चीनच्या दूतावासाने ट्रम्प यांच्या शुल्काबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, अमेरिकेला युद्ध हवे असेल, तर आम्ही युद्धाला तयार आहोत. मग ते व्यापारयुद्ध असो वा अन्य कोणतेही युद्ध. आम्ही शेवटपर्यंत लढणार.