America-China War: गरज पडली तर फौजाही धाडू...! अमेरिकन जनरलच्या युद्धाच्या शक्यतेवर चीनचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 09:15 PM2023-01-30T21:15:06+5:302023-01-30T21:15:34+5:30
जनरल माईक मिनिहन यांनी एअरफोर्सला लिहिलेल्या मेमोमध्ये अमेरिका-चीन युद्धावर भाष्य केले होते. यावर चीनने युद्धाची दोन कारणे सांगितली आहेत.
अमेरिका आणि चीनमध्ये दोन वर्षांत युद्ध पेटणार असल्याची शक्यता अमेरिकेच्या हवाईदलाच्या जनरलने व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. यावर आता चीनच्या जिनपिंग यांच्या सरकारने देखील उत्तर दिले आहे. गरज पडली तर आम्ही फौजाही तैवानमध्ये उतरवू, असे चीनने म्हटले आहे.
जनरल माईक मिनिहन यांनी एअरफोर्सला लिहिलेल्या मेमोमध्ये अमेरिका-चीन युद्धावर भाष्य केले होते. मला वाटते की आपण 2025 मध्ये चीनसोबत युद्ध करू. ही भीती चुकीची सिद्ध व्हावी अशी माझी इच्छा आहे, परंतु अमेरिका आणि तैवान या दोन्ही देशांत २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होतील. त्यामुळे चीनकडून लष्करी कारवाई केली जाऊ शकते, असे मिनिहन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाला अमेरिकन काँग्रेसचे ज्येष्ठ रिपब्लिकन खासदार मायकल मॅकॉल यांनीही पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले होते की, तैवानच्या मुद्द्यावर चीनसोबत संघर्ष होण्याची शक्यता खूप जास्त आहे.
अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले की, तैवान सामुद्रधुनीवर चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींवरून चीनचे हेतू स्पष्टपणे दिसत आहेत. चीनने गेल्या काही वर्षांत तैवानवर राजनैतिक, लष्करी आणि आर्थिक दबावही वाढवला आहे. तैवानला शांतता हवी आहे, परंतू हल्ला झाल्यास त्याला प्रतिकार नक्कीच केला जाईल.
यावर चीन खवळला आहे. अमेरिकन अधिकार्यांच्या या विधानाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आम्ही अमेरिकेला आवाहन करतो की वन चायना पॉ़लिसीला गांभीर्याने घ्यावे आणि दोन्ही देशांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनांचे पालन करावे. तैवानचा डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष स्वातंत्र्यासाठी अमेरिकेवर अवलंबून आहे. अमेरिकेतील काही लोक चीनला रोखण्यासाठी तैवानचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत, या दोन गोष्टी आम्हाला तैवानमध्ये सैन्य उतरविण्यास भाग पाडू शकतात, असे चीनने म्हटले आहे.
अमेरिकेनेही तैवानशी लष्करी संबंध बंद करावेत. तैवान हा चीनचा एक भाग आहे आणि आम्ही ते शांतपणे आणि प्रामाणिकपणे जोडू इच्छितो, असा पुनरुच्चारही प्रवक्ते निंग यांनी केला आहे.