मोठी बातमी! चीनच्या हेरगिरी 'बलून'ला अमेरिकेनं पाडलं, बायडन यांच्या आदेशानंतर कारवाई; पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 08:18 AM2023-02-05T08:18:53+5:302023-02-05T08:19:23+5:30
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत आढळून आलेल्या चीनच्या हेरगिरी 'बलून'वर हल्ला करुन पाडण्यात आला आहे.
नवी दिल्ली-
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत आढळून आलेल्या चीनच्या हेरगिरी 'बलून'वर हल्ला करुन पाडण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली होती. अमेरिकेच्या हद्दीतील सागरी क्षेत्रात हा चीनी बलून आढळून आला होता. आता कारवाईनंतर बलून समुद्रात कोसळला असून त्याचे अवशेष जमा करण्यासाठी अमेरिकन पथकं घटनास्थळावर पोहोचली आहेत.
एपी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार या बलूनवर कारवाई करण्याआधी तीन एअरपोर्टवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. तसंच एअरस्पेस देखील बंद करण्यात आलं होतं. अमेरिकन सैन्याच्या विमानांनी अटलांटिक महासागरावर चीनच्या बलूनला पाडलं आहे.
ज्यो बायडन यांनी याच आठवड्यात चीनच्या या हेरगिरी करणाऱ्या संशयास्पद बलूनला पाडण्याचे आदेश दिले होते. पण बलून समुद्रपातळीवर जाईल याची वाट पाहिली जात होती. बलून समुद्राच्या परिसरात गेल्यानंतर अमेरिकन सैन्यानं कारवाई करत बलून खाली पाडला.
Chinese spy balloon shot down. #ChineseSpyBalloonpic.twitter.com/2LNUUf0Qpr
— Devon Pace (@elitedevon) February 4, 2023
अमेरिकेनं पाडलेला एअर बलून आहे तरी काय?
यूएस, कॅनडा आणि लॅटिन अमेरिकेच्या एअरस्पेसमध्ये चीनचा संशयास्पद बलून आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. अमेरिकेनं जाहीर केलेल्या माहितीनुसार, मोंटाना येथे आकाशात आढळून आलेल्या या बलूनचा आकार तीन बसेस इतका होता. पण या स्पाय बलूनमुळे लोकांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही असं अमेरिकेनं संरक्षण विभागानं जाहीर केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन हवाई क्षेत्रात असलेल्या या बलूनवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात होतं. अमेरिकन सैन्याच्या विमानांकडून बलूनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं गेलं. यातच बायडन यांनी बलून पाडण्याचे आदेश दिले आणि आदेशाचं पालन करत अमेरिकन सैन्यानं कारवाई करत बलूनला समुद्रात यशस्वीरित्या पाडलं आहे.