मोदी भारतात परतताच अमेरिकेने दिला मोठा झटका? १.८८ अब्ज रुपयांची मदत रोखली, मस्क यांच्या डॉजची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 15:08 IST2025-02-16T15:08:23+5:302025-02-16T15:08:53+5:30
अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधरविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प काम करत आहेत. यासाठी अमेरिकेच्या नागरिकांचा जो करातून येणारा पैसा इतर देशांवर वायफळ खर्च केला जात आहे, तो रोखला जात आहे.

मोदी भारतात परतताच अमेरिकेने दिला मोठा झटका? १.८८ अब्ज रुपयांची मदत रोखली, मस्क यांच्या डॉजची माहिती
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला दौरा केला होता. यावेळी मोदींनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तसेच अमेरिकेच्या आर्थिक नाड्या ज्यांच्या हातात आहेत त्या अब्जाधीश एलन मस्क यांची भेट घेतली होती. वेगवेगळ्या आश्वासनांनी ही भेट गाजली होती. परंतू, मोदी भारतात परतत नाहीत तोच अमेरिकेने भारताला मोठा झटका दिला आहे.
अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधरविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प काम करत आहेत. यासाठी अमेरिकेच्या नागरिकांचा जो करातून येणारा पैसा इतर देशांवर वायफळ खर्च केला जात आहे, तो रोखला जात आहे. हे काम ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर सोपविले आहे. त्यांच्या नेतृत्वात सरकारी दक्षता विभाग (DOGE) यावर काम करत आहे. या डॉजने भारताला देण्यात येत असलेली १.८८ अब्ज रुपयांची मदत रोखली आहे.
महत्वाचे म्हणजे अशाप्रकारचे निर्णय मस्क परस्पर घेऊ शकत नाहीत. माझ्या मान्यतेशिवाय मस्क कोणतेही निर्णय घेऊ शकत नाहीत, असे काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते. यामुळे मस्क यांनी सुचविलेला हा निर्णय ट्रम्प यांच्या संमतीनेच जारी करण्यात आला आहे. डॉजने आपल्या एक्स अकाऊंटवर याची माहिती दिली आहे.
अमेरिकेच्या करदात्यांच्या पैशांचा वापर खालील बाबींवर करायचा होता, जे सर्व रद्द करण्यात आले आहेत, अशाप्रकारचे ट्विट करण्यात आले आहे. भारतातील निवडणुकांमध्ये मतदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताला १ अब्ज ८२ कोटी रुपये (२१ दशलक्ष डॉलर्स) एवढा प्रचंड निधी दिला जात होता. तो आता बंद करण्यात आला आहे. आता भारताला हा निधी मिळणार नाही. अमेरिकेने बांगलादेश आणि नेपाळचाही काही दिवसांपूर्वी निधी रोखला आहे.