America Taliban News: अफगाणिस्तानातून सैन्य माघारीनंतर प्रथमच अमेरिका करणार तालिबानशी चर्चा; मान्यता देणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 09:44 AM2021-10-09T09:44:43+5:302021-10-09T09:45:31+5:30
America Taliban News: अमेरिकेचे एक शिष्टमंडळ तालिबान नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
वॉशिंग्टन: काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये असलेले आपले सैन्य माघारी घेतले. याचा परिणाम म्हणजे तालिबानने सक्रीय होत अफगाणिस्तानवर ताबा मिळवत आपले सरकार स्थापन केले. तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता स्थापन करून अनेक दिवस उलटले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील देशांनी मान्यतेबाबत ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. अशातच आता अमेरिका तालिबानशी चर्चा करण्यास तयार झाला आहे. अमेरिकेचे एक शिष्टमंडळ तालिबान नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. (america delegation meet taliban)
अफगाणिस्तानमध्ये अडकलेले अमेरिकन नागरिक यांची सुरक्षितपणे मुक्तता व्हावी, यासाठी अमेरिका तालिबानवर दबाव टाकू शकेल, असे सांगितले जात आहे. तसेच महिलांचे अधिकार कायम राखले जातील. याशिवाय अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कोणत्याही देशाविरोधात केला जाणार नाही, याबाबत तालिबानवर अमेरिकेचा दबाव राहील, असे सांगितले जात आहे.
अमेरिका तालिबानला मान्यता देणार?
दोहा येथे अमेरिकेचे शिष्टमंडळ तालिबानच्या नेत्यांना भेटणार असले, तरी याचा अर्थ असा नाही की अमेरिका तालिबानला मान्यता देणार आहे. तालिबानचे कामकाज आणि अन्य मुद्द्यांसाठी ही भेट निश्चित करण्यात आली आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले. या भेटीचा मुख्य हेतू अफगाणिस्तानात अडकलेल्या अमेरिकन नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे असा असून, यावर तालिबानी नेत्यांशी प्रामुख्याने चर्चा केली जाईल, असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, अफगाणिस्तानातील कुंदूझ येथे शियापंथीयांच्या मशिदीत शुक्रवारी घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात सुमारे १०० जण ठार किंवा जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. कुंदूज प्रांताचे पोलीस उपप्रमुख दोस्त मोहम्मद ओबैदा म्हणाले की, मशिदीत असलेल्या भाविकांपैकी बहुसंख्य लोक बॉम्बस्फोटात ठार झाले आहेत. आत्मघाती हल्लेखोरामार्फत हा बॉम्बस्फोट घडविण्यात आला. सर्वांच्या रक्षणासाठी तालिबान सरकार योग्य उपाययोजना करणार आहे. अफगाणिस्तानमध्ये याआधी २६ ऑगस्टला काबूल विमानतळावर घडविलेल्या बॉम्बस्फोटात १६९ अफगाणी नागरिक व १३ अमेरिकी सैनिक ठार झाले होते.