Donald Trump : "मोदी महान आहेत, ते वडिलांसमान वाटतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 09:40 AM2024-10-10T09:40:30+5:302024-10-10T10:38:46+5:30
Donald Trump And Narendra Modi : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारताच्या नेतृत्वात वारंवार बदल होत होते आणि खूप अस्थिरता होती. मात्र मोदी आल्यावर हे चित्र बदललं असं म्हटलं आहे. कॉमेडियन अँड्र्यू शुल्ट्ज आणि आकाश सिंह यांच्यासोबत 'फ्लॅग्रँट' नावाच्या पॉडकास्टमध्ये ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली.
नरेंद्र मोदी हे गरजेच्या वेळी कठोर होऊ शकणारे सर्वोत्तम व्यक्ती असल्याचं देखील ट्रम्प यांनी सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "मोदी येण्याआधी भारतात पंतप्रधान बदलले जात होते. प्रचंड अस्थिरता होती. मोदी महान आहेत. ते माझे मित्र आहेत. ते वडिलांसमान वाटतात. ते सर्वोत्तम आहेत..."
२०१९ मध्ये टेक्सासच्या ह्यूस्टनमध्ये 'हाऊडी मोदी'च्या यशाबद्दलही ट्रम्प यांनी भाष्य केलं. त्यावेळी ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. स्टेडियममध्ये लोकांची मोठी गर्दी जमली होती. नरेंद्र मोदींना पाहण्यासाठी लोक वेडे होत होते आणि आम्ही आजूबाजूला फिरत होतो... आम्ही सर्वांना हात दाखवत मध्यभागी चालत होतो असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानचे नाव न घेता ट्रम्प म्हणाले, काही प्रसंगी कोणीतरी भारताला धमकावत होतं आणि मी मोदींना म्हणालो की, मला मदत करू द्या कारण मी त्यामध्ये खूप चांगला आहे. त्यावर मोदींनी आक्रमकपणे उत्तर दिलं की, "मी ही परिस्थिती सांभाळेन आणि जे आवश्यक असेल ते करेन. शेकडो वर्षांपासून आम्ही त्यांचा पराभव केला आहे."
पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात जवळचं नातं आहे. पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना 'खरा मित्र' म्हटलं तर ट्रम्प यांनी मोदींच्या नेतृत्वाची आणि व्यक्तिमत्त्वाची नेहमीच प्रशंसा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अहमदाबाद येथे आयोजित 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमासाठी भारतात आले होते. या कार्यक्रमात लाखो लोक सहभागी झाले होते.