निरोपाच्या संदेशात मेलेनिया ट्रम्प यांचं संसद हिंसाचारावर वक्तव्य; म्हणाल्या,"हिंसाचाराचा आधार..."
By जयदीप दाभोळकर | Published: January 19, 2021 11:20 AM2021-01-19T11:20:52+5:302021-01-19T11:22:55+5:30
काही दिवसांपूर्वी ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घडवला होता हिंसाचार
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये जो बायडेन यांना बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर येत्या २० जानेवारीला म्हणजेच उद्या ते आणि कमला हॅरिस या राष्ट्राध्यक्ष आणि उप-राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. यानंतर औपचारिकरित्या डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाईट हाऊस सोडावं लागणार आहे. निवडणुकांच्या निकालामध्ये गडबड झाल्याचा आरोप सातत्यानं डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेच्या परिसरात हिंसाचार घडवला होता. याच हिंसाचाराचा उल्लेख फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी आपल्या निरोपाच्या संदेशात केला. लोकांनी प्रत्येक बाबतीत उत्साही असावं. परंतु हिसाचाराचा आधार कधीही घेतला जाऊ नये, असं त्या म्हणाल्या.
मेलेनिया ट्रम्प यांनी व्हिडीओद्वारे आपला निरोपाचा संदेश अमेरिकेतील नागरिकांना दिला. "आपल्याला प्रत्येक गोष्टींसाठी उत्साही असलं पाहिजे. परंतु हिंसाचार हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. हिंसाचार कधीही योग्य ठरवला जाऊ शकत नाही," असं मेलेनिया ट्रम्प म्हणाल्या. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा संदेश जारी केला आहे.
A Farewell Message from First Lady Melania Trump pic.twitter.com/WfG1zg2mt4
— Melania Trump (@FLOTUS) January 18, 2021
संसद परिसरात हिंसाचार
जगातील सगळ्यात जुनी लोकशाही असा लौकिक असलेल्या अमेरिकी लोकशाहीसाठी बुधवारचा तो दिवस सर्वांत काळाकुट्ट ठरला. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्याकडे अमेरिकीची सूत्रे जाणार, हे स्पष्ट होताच शेकडो ट्रम्प समर्थकांनी थेट अमेरिकी संसदेवरच हल्ला चढवला. कॅपिटॉल हिल परिसरातील संसद इमारतीत घुसून ट्रम्प समर्थकांनी कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या हिंसाचारात चार जण ठार तर अनेक जण जखमी झाले. आंदोलकांनी चार तास संसद वेठीस धरली होती.
अमेरिकी संसदेत मतदारवृंदाच्या मतांची मोजणी सुरू होती. या घटनात्मक प्रक्रियेत बायडेन यांच्या विजयाची औपचारिकता बाकी होती. मात्र, मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना ट्रम्पसमर्थकांनी संसद परिसरात गोळा होण्यास सुरुवात केली. वाढलेल्या गर्दीने एका क्षणी संसदेभोवतालचे सुरक्षा कडे तोडत संसदेच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. या तणावाच्या वातावरणात पोलीस बंदोबस्तही तोकडा पडला.