भारतीय अधिकाऱ्यावर खलिस्तानी पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप; FBIने फरार आरोपींमध्ये टाकले नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 01:58 PM2024-10-18T13:58:59+5:302024-10-18T14:09:43+5:30
अमेरिकेच्या न्याय विभागाने एका माजी भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यावर खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.
Gurpatwant Singh Pannu Case: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी एका भारतीय नागरिकावर अमेरिकेत आरोप निश्चित करण्यात आले आहेत. विकास यादव असे या भारतीय नागरिकाचे नाव आहे. यापूर्वी मूळ आरोपपत्रात विकास यादवचा सीसी-१ असा उल्लेख होता. गुरपतवंत सिंग पन्नूला भारताने दहशतवादी घोषित केले आहे. त्याच्याकडे सध्या अमेरिकन नागरिकत्व आहे. गेल्या काही दिवसांपासून पन्नू भारताविरुद्ध गरळ ओकत आहे. खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचला जात असल्याचे समोर आलं होतं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अमेरिकेच्या न्याय विभागाने विकास यादव या माजी भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यावर खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. तो अधिकारी विकास यादव असून तो आतापर्यंत अमेरिकेत होता, असे म्हटलं आहे. मात्र काही काळापूर्वी त्यांना भारतात बोलावण्यात आले होते. संबंधित अधिकाऱ्याला काढून टाकण्यात आल्याचे अमेरिका आणि भारत या दोघांनी गुरुवारी सांगितले होते. भारताच्या तपासावर आम्ही समाधानी आहोत, असे अमेरिकेने म्हटले होते. आम्ही विकास यादववर तीन आरोप लावले आहेत, त्यापैकी दोन प्रमुख आरोप पन्नूची हत्या आणि मनी लाँड्रिंगचा कट आहे, असं अमेरिकेचे म्हटलं आहे.
यापूर्वी, गेल्या वर्षी आणखी एका भारतीय निखिल गुप्ताला या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. निखिल गुप्ताला गेल्या वर्षी झेक प्रजासत्ताकमध्ये अटक करण्यात आली होती. विकास यादववर भारतात राहून निखिल गुप्ता यांच्याशी संपर्क साधल्याचा आरोप आहे. विकास यादवने निखिल गुप्ता याला पन्नूचा खून करण्यासाठी हल्लेखोराला कामावर घेण्यास सांगितले असा आरोप आहे. अमेरिकेने १७ ऑक्टोबर रोजी विकास यादववर आरोप निश्चित केले होते. त्यावेळी तपासासाठी भारतीय पथक अमेरिकेला पोहोचले होते. त्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅट मिलर म्हणाले की, भारतीय तपास पथकाने सांगितले आहे की विकास यादव आता भारत सरकारसोबत काम करत नाही.
या सगळ्या दरम्यान विकास यादव हे भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयात कार्यरत होते. हे सचिवालय भारताच्या फॉरेन इंटेलिजन्स सर्व्हिस रिसर्च अँड ॲनालिसिस विंगचे काम पाहत होते.
विकास यादवने निखिल गुप्ताला कामावर ठेवल्याचे अमेरिकेच्या मॅनहॅटन न्यायालयात सांगण्यात आले. त्यानंतर निखिल गुप्तानेच पन्नूच्या हत्येचा कट रचला होता. निखिल गुप्ता गेल्या वर्षी जूनमध्ये भारतातून प्रागला गेला होता. तिथे त्याला झेक अधिकाऱ्यांनी अटक केली आणि नंतर त्याला अमेरिकेला पाठवण्यात आले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, तिथे निखिल गुप्ताने आपण निर्दोष असल्याची बाजू मांडली.