आधी ग्रीनलँडवर ताबा मिळण्याची धमकी, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलले मोठे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 20:31 IST2025-03-24T20:30:36+5:302025-03-24T20:31:24+5:30
America-Greenland : डोनाल्ड ट्रम्प यांची ग्रीनलँडला अमेरिकेत विलीन करण्याची महत्त्वाकांक्षा सर्वश्रृत आहे.

आधी ग्रीनलँडवर ताबा मिळण्याची धमकी, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलले मोठे पाऊल
America-Greenland : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून टॅरिफ आणि अवैध स्थलांतरितांसारखे एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. त्यांची ग्रीनलँड अमेरिकेत विलीन करण्याची महत्त्वाकांक्षा कोणापासून लपलेली नाही. याच पार्श्वभूमीवर त्यांनी उपाध्यक्ष जेडी वेन्स यांच्या पत्नी उषा वेन्स आणि अमेरिकन शिष्टमंडळ या आठवड्यात ग्रीनलँडला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीनलँडचे पंतप्रधान म्यूट एगेडे यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध केला असून, या दौऱ्याला 'अत्यंत आक्रमक दृष्टिकोन' म्हटले आहे.
ग्रीनलँड, आर्क्टिक आणि उत्तर अटलांटिक महासागराच्या मध्ये वसलेले बेट, डेन्मार्कचा एक स्वायत्त प्रदेश आहे. सत्तेत आल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडला अमेरिकेत विलीन करण्याचा सातत्याने आग्रह धरला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी ग्रीनलँड अत्यंत महत्त्वाचा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. ग्रीनलँड अमेरिकेत विलीन करण्यासाठी बळाचा वापर करण्याची शक्यताही त्यांनी नाकारली नाही.
व्हाईट हाऊसने रविवारी जाहीर केले की, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांच्या पत्नी उषा या आठवड्यात त्यांचा मुलगा आणि अमेरिकन शिष्टमंडळासह ग्रीनलँडचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याबाबत ग्रीनलँडच्या पंतप्रधानांनी सोमवारी अमेरिकेवर ग्रीनलँडच्या राजकीय कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. ग्रीनलँडचे पीएम एगेडे म्हणाले, परकीय हस्तक्षेपाशिवाय आमची अखंडता आणि लोकशाहीचा आदर केला पाहिजे. या भेटीला केवळ खासगी भेट म्हणून पाहता येणार नाही. विशेष म्हणजे, यापूर्वी जानेवारीच्या सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ज्युनियरही ग्रीनलँडला गेला होता.
अमेरिकेला ग्रीनलँड का हवाय?
ग्रीनलँड एकेकाळी डेन्मार्कची वसाहत होता, पण 1953 मध्ये हा स्वतंत्र प्रदेश म्हणून उदयास आला. पण डेन्मार्क अजूनही ग्रीनलँडच्या परराष्ट्र व्यवहार, संरक्षण आणि आर्थिक धोरणांवर नियंत्रण ठेवतो. डेन्मार्क ग्रीनलँडच्या अर्थव्यवस्थेतही महत्त्वाची भूमिका बजावतो आणि दरवर्षी ग्रीनलँडला अंदाजे 1 अब्ज डॉलर्स देतो. ग्रीनलँडमध्ये खनिजे आणि तेलाचे प्रचंड साठे आहेत. तिथला बर्फ वितळत असल्यामुळे तेथील दुर्मिळ नैसर्गिक संसाधने काढणे सोपे झाले आहे.
बर्फ वितळल्याने नवीन शिपिंग मार्ग देखील तयार होत आहेत. मात्र, पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून सध्या तेल आणि युरेनियम आदींच्या उत्खननावर बंदी आहे. ग्रीनलँड हे सामरिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळेच अमेरिका त्याला सामावून घेण्याची इच्छा व्यक्त करत आहे. ग्रीनलँडमधील बहुतांश नागरिकांनाही डेन्मार्कपासून स्वातंत्र्य हवे आहे, परंतु ते अमेरिकेत सामील होऊ इच्छित नाहीत, असे अनेक सर्वेक्षणांतून समोर आले आहे. त्यांना ग्रीनलँडला स्वतंत्र देश म्हणून पाहायचे आहे.