भीषण! अमेरिकेत बेरिल वादळाचं तांडव; २० लाख लोकांना फटका, ८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 10:48 AM2024-07-10T10:48:30+5:302024-07-10T11:03:45+5:30
बेरिल चक्रीवादळाने अमेरिकेत कहर केला आहे. २० लाखांहून अधिक लोकांना जोरदार वारा, पुराचा मोठा फटका बसला आहे.
बेरिल चक्रीवादळाने अमेरिकेत कहर केला आहे. २० लाखांहून अधिक लोकांना जोरदार वारा, पुराचा मोठा फटका बसला आहे. याच दरम्यान मंगळवारी आणखी ८ जणांचा मृत्यू झाला. एएफपीच्या वृत्तानुसार, वादळामुळे झाडे पडल्याने आणि प्रचंड पुरामुळे ८ जणांना जीव गमवावा लागला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादळामुळे टेक्सासमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे आणि लुइसियानामध्ये आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
वादळानंतर पॉवर ग्रीड प्रभावित झाल्यामुळे, टेक्सासमधील २० लाखांहून अधिक घरं अंधारात आहेत. तिथे वीज नाही. लुइसियानामध्येही १४ हजार घरं वीजेविना होती. आग्नेय टेक्सासमधील २० लाखांहून अधिक घरातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ती घरं अंधारात होती. स्थानिक प्रशासन तुटलेल्या तारा आणि खराब झालेले पॉवर ग्रीड दुरुस्त करण्यात व्यस्त आहे.
वादळाचे तीव्र स्वरूप पाहता सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे. बेरिल वादळाचा मंगळवारी वेग थोडा कमी झाला होता आणि ताशी ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहून ते उत्तर-पूर्वेकडे कॅनडाच्या दिशेने सरकत होते. यामुळे पूर आणि चक्रीवादळ येऊ शकतं, असा इशारा देण्यात आला आहे. ह्यूस्टनमध्ये २० लाखांहून अधिक लोक राहतात, ज्यांना वादळ, जोरदार वारा आणि पूर यांचा मोठा फटका बसला आहे.
गेल्या आठवड्यातच, बेरिल चक्रीवादळामुळे जमॅका, ग्रेनेडा आणि सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्समध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला, जिथे किमान १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. हे वादळ सध्या वेगाने ईशान्येकडे सरकत आहे. मंगळवार आणि बुधवारी, लोअर मिसिसिपी व्हॅली आणि नंतर ओहायो व्हॅलीकडे जाण्यापूर्वी ते पूर्व टेक्सासमध्ये त्याचा परिणाम होईल.