अमेरिका सर्वात मोठा अणुबॉम्ब तयार करणार; हिरोशिमा बॉम्बपेक्षा 24 पट अधिक शक्तिशाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 06:15 PM2023-10-31T18:15:02+5:302023-10-31T18:15:41+5:30
अमेरिका हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बपेक्षा 24 पट अधिक शक्तिशाली बॉम्ब तयार करत आहे.
वॉशिंग्टन: दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बची सर्वांनाच माहिती आहे. त्या अणुबॉम्बमुळे दोन मोठी शहरे नामशेष झाली होती. आता अमेरिका या बॉम्बपेक्षा 24 पट अधिक शक्तिशाली अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीत आहे.
यूएस संरक्षण विभागाच्या घोषणेनुसार, हा B61 न्यूक्लिअर ग्रॅव्हिटी बॉम्बचे अॅडव्हान्स व्हर्जन असेल, ज्याला B61-13 असे नाव देण्यात आले आहे. हा बॉम्ब बनवण्यासाठी काँग्रेसची (संसद) मान्यता घ्यावी लागेल. फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, पेंटागॉनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, B61-13 ऊर्जा विभागाच्या राष्ट्रीय अणु सुरक्षा प्रशासनद्वारे तयार केला जाईल. 360 किलोटन वजनाचा B61-13 अणुबॉम्ब B61-7 ची जागा घेईल, म्हणजेच अणुबॉम्बची संख्या वाढणार नाही, पण त्याचा साठा अधिक धोकादायक होईल.
जपानवर टाकलेल्या बॉम्बपेक्षा शक्तिशाली
नवीन बॉम्बच्या तुलनेत हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बचे वजन 15 किलोटन होते, तर नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बचे वजन 25 किलोटन होते. सोप्या शब्दात सांगायचे तर, नवा बॉम्ब हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा 24 पट अधिक शक्तिशाली आणि नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बपेक्षा 14 पट अधिक शक्तिशाली असेल.
वाढता धोका पाहता घेतला निर्णय
अंतराळ संरक्षण धोरणाचे सहाय्यक सचिव जॉन प्लंब यांनी सांगितले की, जगातील सध्याच्या सुरक्षा परिस्थितीत बदलणारे आणि वाढते धोके लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही आमच्या देशाला आणि आमच्या मित्र राष्ट्रांना खात्री देऊ इच्छितो की, आम्ही वाढत्या सुरक्षा आव्हानांबद्दल जागरूक आहोत आणि गरज पडल्यास त्यांना योग्य प्रतिसाद देण्यास सक्षमही आहोत.