अमेरिकेत न्यायाधीश आपसात चर्चेने ठरवितात निकाल
By admin | Published: July 24, 2015 12:15 AM2015-07-24T00:15:04+5:302015-07-24T00:15:04+5:30
ज्याचा सर्वसामान्य नागरिकांवर व्यापक परिणाम होईल अशा महत्त्वाच्या प्रकरणांचा निकाल अमेरिकेच्या संघीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांसह
वॉशिंग्टन : ज्याचा सर्वसामान्य नागरिकांवर व्यापक परिणाम होईल अशा महत्त्वाच्या प्रकरणांचा निकाल अमेरिकेच्या संघीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांसह नऊ न्यायाधीश आपसात चर्चा करून शक्यतो मतैक्याने देतात. ही माहिती सॅम्युअल अलिटो या न्यायाधीशांनी दिली आहे.
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची कारकीर्द पणाला लावणारी सार्वत्रिक आरोग्य विमा योजना वैध ठरविणे आणि समलिंगी विवाह हा मूलभूत हक्क म्हणून घोषित करणे या अलीकडे दिल्या गेलेल्या दोन लागोपाठच्या निकालांनी अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय चर्चेत राहिले होते. या पार्श्वभूमीवर न्यायाधीश अलिटो यांनी ‘वीकली स्टँडर्ड’ या नियतकालिकास दिलेल्या मुलाखतीतील हे निकाल कसे ठरतात याची दिलेली माहिती उद््बोधक आहे.
न्यायाधीश अलिटो यांच्या म्हणण्यानुसार असे घडते- प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी सर्व न्यायाधीश एकत्र जमतात व त्या आठवड्यात ज्या प्रकरणांत युक्तिवाद संपले असतील त्यावर चर्चा करतात. एखाद्या प्रकरणात कसा निकाल दिला जावा याविषयी सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस् सर्वप्रथम आपले मत मांडतात. त्यानंतर टेबलावरील इतर न्यायाधीश आपापल्या ज्येष्ठता क्रमानुसार बोलतात व आपापले मत देतात. सर्वांना बोलू दिल्याखेरीज कोणाही न्यायाधीशाला दुसऱ्या फेरीत बोलू दिले जात नाही.
(वृत्तसंस्था)