Afghanistan: अमेरिकेला एकच चूक नडली; तालिबानच्या मास्टरमाईंड बरादरला 2018 मध्ये सोडले तिथेच फसले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 01:53 PM2021-08-16T13:53:57+5:302021-08-16T15:57:07+5:30
Afghanistan Crisis, Taliban will be in power soon: अफगानिस्तानचा नवा राष्ट्राध्यक्ष कोण? तालिबान 90 दिवसांत काबुल काबीज करेल हा अमेरिकेचा अंदाज साफ चुकला आणि तीन ते चार दिवसांत तालिबान काबुलमध्ये घुसला होता. तालिबानचे दहशतवादी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानातही घुसले होते.
अमेरिका गेल्यानंतर हतबल झालेल्या अफगानिस्तानच्या (Afghanistan) राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा देऊन पलायन केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेने अब्जावधी रुपये खर्च करून गेली २० वर्षे तालिबानला (Taliban) सत्तेपासून लांब ठेवले होते. परंतू, पुन्हा तालिबानी सत्ता स्थापन होण्याच्या टप्प्यात आहेत. तालिबानचा नेता मुल्ला अब्दुल गनी बरादर (mullah abdul ghani baradar) हा अफगानचा पुढील राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता आहे. (Abdul Ghani Baradar, the Taliban leader who is likely to become new Afghanistan President.)
धक्कादायक बाब म्हणजे तालिबान 90 दिवसांत काबुल काबीज करेल हा अमेरिकेचा अंदाज साफ चुकला आणि तीन ते चार दिवसांत तालिबान काबुलमध्ये घुसला होता. तालिबानचे दहशतवादी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानातही घुसले होते. यामुळे बरादरचे नाव जगासमोर आले आहे. हा बरादर नेमका आहे तरी कोण? (who is mullah abdul ghani baradar of Taliban.)
बरादरचा जन्म हा उरुजगान प्रांतात 1968 मध्ये झाला होता. तालिबानचा तो सह संस्थापक आहे. हैबतुल्लाह अखुंदज़ादा यांच्यानंतर बरादर दुसऱ्या क्रमांकाचा नेता आहे. 2010 मध्ये बरादरला आयएसआयने कराचीमध्ये अटक केली होती. परंतू अमेरिकेच्या विरोधानंतर त्याला 2018 मध्ये सोडण्यात आले होते. सध्या बरादर हाच तालिबानचा म्होरक्या आणि राजकीय चेहरा आहे.
Mullah Baradar to Taliban: “we have reached a victory that wasn’t expected…we should show humility in front of Allah…now it’s time of test — now it’s about how we serve and secure our people, and ensure their future/good life to best of ability”
— Mujib Mashal (@MujMash) August 15, 2021
pic.twitter.com/EP6R8B5dot
एका रिपोर्टनुसार बरादर हा रविवारी दोहा येथून काबुलला पोहोचला आहे. त्याने एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. यामध्ये तालिबानची खरी परीक्षा आता सुरु होणार आहे. कारण त्यांना आता देशाची सेवा करायची आहे.
बरादरने 1980 च्या दशकात सोव्हिएत युनियनविरोधात अफगान मुजाहिदीन मध्ये युद्ध लढले होते. 1992 मध्ये रशियाला बाहेर हाकलल्यानंतर प्रतिद्वंदी सरदारांमध्ये गृहयुद्ध सुरु झाले होते. यावर बरादरने माजी कमांडर आणि नातेवाईक मोहम्मद उमर सोबत मिळून कंदाहरमध्ये एक मदरसा स्थापन केला होता. यानंतर 1994 मध्ये दोघांनी तालिबानची स्थापना केली होती. युद्ध लढणारे म्हणजेच सरदारांमध्ये अफगानींमध्ये तिरस्कार वाढू लागला आणि आयएसआयच्या समर्थनामुळे तालिबानने 1996 मध्ये एकामागोमाग एक प्रांत ताब्यात घेण्यास सुरुवात केली. बरादर हा त्याच्या रणनितींसाठी ओळखला जातो.
तालिबानची सत्ता होती तेव्हा बरादर हा उप संरक्षण मंत्री होता. तसेच अन्य महत्वाची खाती त्याच्याकडे होती. अमेरिकेच्या आक्रमनानंतर तालिबानची सत्ता गेली होती. आता पुन्हा तालिबानने अमेरिकेला नमवत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली केल्या आहेत.