झुकेरबर्ग यांच्या दाव्याने संपूर्ण अमेरिकेत उडाली खळबळ, कमलांचं टेन्शन वाढलं, ट्रम्प यांना मोठं शस्त्र मिळालं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 05:47 PM2024-08-27T17:47:55+5:302024-08-27T17:48:37+5:30
येणाऱ्या 10 सप्टेंबरला डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात सर्वात महत्वाची, सर्वात मोठी आणि अखेरची अध्यक्षीय डिबेट होणार आहे.
मेटाचे सीईओ तथा फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. यामुळे संपूर्ण अमेरिकेत चर्चेला उधाण आले आहे. आता डोनाल्ड ट्रम्प नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत या दाव्यांचा वापर कमला हॅरिस यांच्या विरोधात शस्त्र म्हणून करू शकतात, असे कयासही लावले जात आहेत. खरे तर, झुकेरबर्ग यांनी न्यायिक समितीला लिहिलेल्या एक पत्रात, कोरोनाशी संबंधित पोस्ट सेन्सॉर करण्यासाठी ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मेटाच्या टीम्सवर 'वारंवार दबाव' टाकल्याचा आरोप केला आहे.
मार्क इलियट झुकेरबर्ग म्हणाले, आपल्याला आपल्या प्लॅटफॉर्मवर काही बदल करावे लागले. तसेच यासंदर्भात आपण स्पष्टपणे न बोलल्याचा आपल्याला खेद वाटतो. 2021 मध्ये व्हाइट हाऊससह बायडेन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विनोद आणि व्यंग्यांसह काही COVID-19-संबंधित सामग्री सेन्सॉर करण्यासाठी आमच्यावर अनेक महिने दबाव टाकला.
या पत्रात झुकेरबर्ग लिहितात, सामग्री काढून टाकायची की नाही हा आमचा निर्णय होता. माझ्या मते सरकारी दबाव चुकीचा होता आणि मला खेद वाटतो की आम्ही त्याबद्दल स्पष्टपणे बोललो नाही. तसेच, मागे वळून पाहिले असता, आम्ही काही असे पर्याय निवडले, जे आज निवडले नसते, असे मला वाटते, असेही झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.
येणाऱ्या 10 सप्टेंबरला डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात सर्वात महत्वाची, सर्वात मोठी आणि अखेरची अध्यक्षीय डिबेट होणार आहे. यासंदर्भात, काही तज्ज्ञ कमला हॅरिस यांचे पारडे जड असल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे, या डिबेटच्या तयारीसाठी आपण संपूर्ण आयुष्य घालवू शकत नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.