आईच्या फोनच्या व्यसनाने घेतला लेकाचा जीव; 'ती' सेल्फी काढत राहिली अन् मुलाचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 03:40 PM2023-10-04T15:40:47+5:302023-10-04T15:51:46+5:30
मुलाची आई तासनतास फोनवर मग्न आणि गाणी गाण्यात व्यस्त असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
अमेरिकेतील टेक्सासमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वॉटर पार्कमधील पूलमध्ये बुडून एका तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूला अन्य कोणी जबाबदार नसून त्याची आईच जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. मुलाची आई तासनतास फोनवर मग्न आणि गाणी गाण्यात व्यस्त असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
द न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, महिलेच्या वकिलाने वॉटर पार्कमध्ये उपस्थित असलेल्या लाइफगार्डवर मुलाकडे लक्ष न दिल्याचा आरोप केला. एल पासो येथील कॅम्प कोहेन वॉटरपार्क येथे ही घटना घडली. जेसिका वीवर असं आरोपी महिलेचं नाव आहे. आता या महिलेवर निष्काळजीपणाचा आरोप आहे आणि तिचा एकुलता एक मुलगा एंथनी लियो मालवेच्या मृत्यूसाठी तिला जबाबदार धरलं जात आहे.
घटनेच्या वेळी, 18 लाइफगार्ड्स पार्कमध्ये कर्तव्यावर उपस्थित होते, त्यापैकी एकाने 3 वर्षांच्या मुलाला पूलमधून बाहेर काढलं. हा पूल 4 फूट खोल होता, त्यात मुलगा मृतावस्थेत पडला होते. मुलाने लाईफजॅकेट घातलं नव्हतं. कॅम्प कोहेन वॉटरपार्कच्या नियमांनुसार 6 वर्षाखालील मुलांचे पर्यवेक्षण अनुभवी जलतरणपटूद्वारे करणे आवश्यक आहे, परंतु मुलाजवळ कोणीच नव्हतं.
पुलाजवळ उपस्थित असलेल्या एका महिलेने साक्ष दिली की मुलाची आई एक तासाहून अधिक काळ तिच्या फोनमध्ये व्यस्त होती, तिने वर पाहिले नाही किंवा मुलाकडे लक्ष दिलं नाही. दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की, महिला पुलजवळ सतत फोटो काढत होती. 30 ऑगस्ट रोजी आरोपी महिलेला तिच्या इंडियाना येथील गावी पकडण्यात आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.