फाशी किंवा विषाचे इंजेक्शन नाही; अमेरिकेत पहिल्यांदाच गॅसद्वारे दिली जाणार मृत्यूदंडाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 06:40 PM2024-01-23T18:40:54+5:302024-01-23T18:41:34+5:30
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या कैद्याला गॅसद्वारे मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे.
America News : अमेरिकेतील एका कैद्याला नायट्रोजन वायूद्वारे मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केनेथ यूजीन स्मिथ असे या कैद्याचे नाव असून, येत्या 25 जानेवारी रोजी त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी होईल. एखाद्या कैद्याला अशा प्रकारे मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची अमेरिकेच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केनेथ यूजीन स्मिथने 1988 मध्ये पैशांसाठी एका महिलेची हत्या केली होती. त्याला 1996 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अनेक वर्षा शिक्षेची अंमलबजावणी झाली नाही. 2022 मध्ये त्याला विषारी इंजेक्शनही देण्यात आले होते, पण त्यातून तो वाचला. आता त्याला 25 जानेवारी रोजी शिक्षा दिली जाणार आहे.
या शिक्षेला त्याच्या वकिलांनी कोर्टात आव्हान दिले आहे. स्मिथवर प्रयोग केला जात असल्याचा आरोप त्याच्या वकिलांचे केला आहे. ही पद्धत धोक्याची तर आहेच, पण संविधानाचे उल्लंघनही असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. यावर संयुक्त राष्ट्र संघानेही आक्षेप नोंदवला आहे. संयुक्त राष्ट्रांनी या शिक्षेला अमानवी आणि क्रूर ठरवत बंदी घालण्याची मागणी केली आहे.
अशी दिली जाईल शिक्षा
रिपोर्ट्सनुसार, सर्वप्रथम स्मिथला स्ट्रेचरवर झोपवले जाईल, यानंतर त्याच्या चेहऱ्यावर मास्क लावला जाईल. यातून त्याच्या शरीरात नायट्रोजन वायू सोडला जाईल. मास्क लावल्यामुळे त्याला ऑक्सिजन मिळणार नाही आणि त्याचा मृत्यू होईल. त्याला किमान 15 मिनिटे मास्कद्वारे नायट्रोजन दिले जाईल. नायट्रोजन वायूमुळे तो काही सेकंदात बेशुद्ध होईल आणि काही मिनिटांतच त्याचा मृत्यू होईल, असे सरकारी वकिलाने न्यायालयाला सांगितले.