अमेरिकेचा ५० वर्षांनंतर चंद्रावर नवा विक्रम! पहिले खाजगी अंतराळयान दक्षिण ध्रुवावर उतरवले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 11:28 AM2024-02-23T11:28:45+5:302024-02-23T11:29:35+5:30
१९७२ नंतर पुन्हा एकदा अमेरिकेचे एखादे अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाले आहे
America Odysseus spacecraft on Moon: जवळपास ५० वर्षांत प्रथमच अमेरिकन अंतराळयान चंद्रावर उतरले आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे याआधीचे अमेरिकन यान १९७२ मध्ये उतरले होते. ते मिशन अपोलो 17 होते. त्यानंतर आता ५० वर्षांनी चंद्रावर उतरलेल्या लँडरचे नाव आहे - ओडिसियस लँडर. हे ह्यूस्टनच्या इंट्यूटिव्ह मशीन्सने बनवले आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:53 वाजता त्याचे लँडिंग झाले. चंद्रावर उतरणारे हे खासगी कंपनीचे पहिले अंतराळयान ठरले आहे. जेव्हा ओडिसियस लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला तेव्हा काही बिघाडामुळे टीमचा अवकाशयानाशी संपर्क तुटला. परंतु शास्त्रज्ञांनी सांगितले की ते सुरक्षितपणे उतरले आहे आणि कार्यरत आहे. हे लँडिंग व्यावसायिक अवकाशयान आणि अमेरिकन अवकाश उद्योगासाठी मैलाचा दगड मानला जात आहे.
मिशन ७ दिवस राहणार सक्रिय
हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे. अमेरिकेचे हे मिशन ७ दिवस सक्रिय राहणार आहे. कारण थंडीमुळे अवकाशयान बिघडू शकते. यासह दक्षिण ध्रुवावर उतरणारा अमेरिकाभारतानंतर दुसरा देश ठरला आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला. ओडिसियसचे लँडिंग १४ फेब्रुवारी रोजी होणार होते, परंतु तांत्रिक कारणांमुळे ते पुढे ढकलावे लागले.
अमेरिका २०२६ मध्ये चंद्रावर मानव उतरण्याच्या तयारीत
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या पाच देशांपैकी अमेरिका एक आहे. तथापि, हा एकमेव देश आहे ज्याचे अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले आहेत. पुढील वर्षी पुन्हा चंद्राभोवती अंतराळवीर पाठवण्याचे अमेरिकेचे लक्ष्य आहे. याशिवाय, २०२६ मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग होणार आहे, जे ५० वर्षांहून अधिक काळानंतर चंद्रावर पहिले मानव लँडिंग असेल.