America on Pakistan:'पाकिस्तान जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक', जो बायडेन यांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 01:38 PM2022-10-15T13:38:51+5:302022-10-15T13:40:19+5:30
America on Pakistan: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
America on Pakistan: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी पाकिस्तानबाबत (Pakistan) मोठे वक्तव्य केले आहे. 'माझ्या मते पाकिस्तान हा जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक आहे. ते कोणत्याही देखरेखीशिवाय अण्वस्त्रे बाळगतात,' असे वक्तव्य बायडन यांनी केले आहे. डेमोक्रॅटिक काँग्रेस प्रचार समितीच्या स्वागत समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी रशियावरही टीका केली.
पाकिस्ताकडे 160 अण्वस्त्रे
पाकिस्तानबाबत बायडेन यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा जगात अणुयुद्धाची चर्चा सुरू आहे. पाकिस्तान आपल्याकडे सातत्याने अण्वस्त्रांची संख्या वाढवत आहे. रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानकडे 160 अण्वस्त्रे आहेत. जागतिक स्तरावर बदलत्या भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे हे वक्तव्य महत्वाचे आहे. द डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे ऊर्जा मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी बायडेन यांचे वक्तव्य निराधार असल्याचे म्हटले आहे.
"What I think is maybe one of the most dangerous nations in the world, Pakistan. Nuclear weapons without any cohesion", said US President Joe Biden at Democratic Congressional Campaign Committee Reception pic.twitter.com/cshFV5GVHY
— ANI (@ANI) October 15, 2022
बायडेन यांची रशियावरही टीका
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या भाषणात रशियाच्या राष्ट्राध्यक्षांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, 'क्यूबा मिसाइल संकटानंतर एखादा रशियन नेता अण्वस्त्रांच्या वापराची धमकी देऊ शकतो, असा विचार कधी केला होता का. त्यांनी हजारो लोकांनाही ठार केले. कोणी विचार केला होता की, आपण अशा परिस्थिती येऊ, जिथे रशिया, भारत आणि पाकिस्तानसह चीनही आपली भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.'
जग अमेरिकेकडे आशेने पाहत आहे
व्हाईट हाऊसनुसार, बायडेन पुढे म्हणाले की, 'जग वेगाने बदलत आहे. देश त्यांच्या युतींचा पुनर्विचार करत आहेत आणि वस्तुस्थिती अशी आहे की जग अमेरिकेतडे आशेने पाहत आहे. आपण काय करतो, हे पाहण्यासाठी आपले शत्रू देखील आपल्यावर लक्ष ठेवून असतात. बरेच काही पणाला लागले होते. जगाला पूर्वी कधीही नव्हत्या अशा ठिकाणी नेण्याची क्षमता अमेरिकेत आहे,' असेही बायडन म्हणाले.