तातडीने रशिया सोडा, अमेरिकेने नागरिकांना दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 07:37 AM2023-02-14T07:37:30+5:302023-02-14T07:50:26+5:30
मॉस्कोमधील अमेरिकन दूतावासाने म्हटले की, ‘रशियामध्ये राहणाऱ्या किंवा भेट देणाऱ्या अमेरिकन नागरिकांनी त्वरित देश सोडावा. अतिरिक्त सावधगिरी बाळगा.
मॉस्को : युक्रेन युद्धामुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांना लवकरात लवकर रशिया सोडण्याचे आदेश दिले आहेत. रशियन एजन्सी अमेरिकन नागरिकांना अटक करू शकतात किंवा त्यांचा छळ करू शकतात, अशी भीती अमेरिकेला वाटत आहे. त्यामुळे अमेरिकेने वरील आदेश दिले आहेत.
मॉस्कोमधील अमेरिकन दूतावासाने म्हटले की, ‘रशियामध्ये राहणाऱ्या किंवा भेट देणाऱ्या अमेरिकन नागरिकांनी त्वरित देश सोडावा. अतिरिक्त सावधगिरी बाळगा. रशियाला भेट देऊ नका, असे दूतावासाने म्हटले आहे. अमेरिकेने वारंवार आपल्या नागरिकांना रशिया सोडण्यास सांगितले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जमावबंदीचे आदेश दिले तेव्हा असाच इशारा देण्यात आला होता. दूतावासाने सांगितले की, ‘रशियन एजन्सीने खोट्या आरोपाखाली अमेरिकन नागरिकांना अटक केली आहे. त्यांना कोठडीत ठेवले आणि छळही करण्यात येत आहे.
रशियावर हल्ल्याचा अमेरिकेचा प्रयत्न
दोन्ही देशांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. रशियाच्या गुप्तहेर शाखेने सांगितले की त्यांना गुप्त माहिती मिळाली आहे. अमेरिकन सैन्य रशियावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना तयार करत आहे. इस्लामिक स्टेट आणि अल कायदाशी संबंधित गटांमधून अशा ६० दहशतवाद्यांची भरती करण्यात आली होती. त्यांना सीरियातील अमेरिकन तळावर प्रशिक्षण दिले जात होते, असा आरोप रशियाने केला आहे.