CoronaVirus : जगात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या अमेरिकेत, चीनलाही टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 02:33 PM2020-03-27T14:33:56+5:302020-03-27T14:39:58+5:30
जॉन्स हॉपकिंस विद्यापीठाच्या रियल टाईम कोरोना व्हायसर ट्रॅकरनुसार, अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या वाढू ती 82,404 वर पोहोचली आहे. अमेरिका इतर देशांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांचा शोध घेत आहे. हेदेखील यामागचे एक कारण आहे.
वॉशिंग्टन - कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. आता अमेरिकाच कोरोनाचे केंद्र होतो की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण अमेरिकने कोरोना संक्रमित रुग्ण संख्येच्या बाबतीत आता चीनलाही मागे टाकले आहे.
जॉन्स हॉपकिंस विद्यापीठाच्या रियल टाईम कोरोना व्हायसर ट्रॅकरनुसार, अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या वाढू ती 82,404 वर पोहोचली आहे. अमेरिका इतर देशांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांचा शोध घेत आहे. हेदेखील यामागचे एक कारण आहे.
आतापर्यंत 3 लाख 70 हजार लोकांची तपासणी -
व्हाइट हाऊसमधील कोरनासंदर्भातील समन्वयक डॉ. डेबोरा बीरक्स यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आतापर्यंत अमेरिकेने 3 लाख 70 हजार लोकांची तपासणी केली आहे. गेल्या आठ दिवसांत आम्ही 2 लाख 20 हजारहून अधिक लोकांची तपासणी केली, असे त्यांनी सांगितले.
चीनमध्ये आतापर्यंत 81 हजार 782 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, असे असले तरी अमेरिकेतील मृतांचा आकडा चीनच्या तुलनेत कमी आहे. अमेरिकेत आतापर्यंत केवळ 1,178 लोकांचाच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर चीनमध्ये 3,291 लोकांचा कोरोनामुले मृत्यू झाला आहे.
160 मिलियन अमेरिकन जणतेला घरातच थांबण्याचा आदेश -
द न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार जवळपास 160 मिलियन अमेरिकन जणतेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. एवढेच नाही, तर येथील शाळा, बार आणि रस्तेही बंद करण्यात आले आहेत.
डब्ल्यूएचओने 11 मार्चला कोरोना ही एक जागतीक महामारी असल्याची घोषित केले होते. अमेरिकेत न्यू यॉर्क हे शहर कोरोना व्हायरसचे केंद्र बनले आहे. या एकट्या शहरात आतापर्यंत जवळपास 38,000 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 281 लोक मरण पावले आहेत.
कोरोनाचा धोका वाढवणाऱ्यांना मानले जाणार 'दहशतवादी' -
अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या नियमांकडे तेथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे येथील कोरोना बाधितांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता येथील न्यायविभागाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. एका नव्या आदेशानुसार, आता कोरोना व्हायरसचा धोका दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्यांना येथे दहशतवादी समजण्यात येणार आहे. एवढेच नाही तर गुन्हा सिद्ध झाल्यास जन्मठेपेच्या शिक्षेचीही तरतूद यात करण्यात आली आहे.