अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये जमावावर अंदाधुंद गोळीबार; तिघांचा मृत्यू, 14 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 04:23 PM2022-06-05T16:23:33+5:302022-06-05T16:28:23+5:30
America Philadelphia : अमेरिकेत अलीकडच्या काळात गोळीबाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये एका बंदूकधाऱ्याने जमावावर अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. अमेरिकन न्यूज चॅनल एनबीसीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्रीनंतर घडली. यात अनेक बंदूकधारी सामील असल्याचं म्हटलं जात आहे. प्राथमिक रिपोर्टनुसार मृतांचा आकडा वाढू शकतो. आतापर्यंत किमान 14 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही परंतु एक शस्त्र जप्त करण्यात आलं आहे. सध्या संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, शूटरपैकी एक अमेरिकन साऊथ स्ट्रीटवर धावताना दिसला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी दोन बंदुका सापडल्या असून त्यापैकी एकामध्ये एक मॅगझिन आहे. अधिकाऱ्यांनी साऊथ स्ट्रीटवरील दुसऱ्या आणि पाचव्या रस्त्यांदरम्यानचा भाग रात्रभर बंद केला.
मृतांचा आकडा वाढू शकतो
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 25 वर्षीय महिला आणि एका 22 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 7 जखमींना थॉमस जेफरसन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संशयितासह इतर पाच जणांना पेनसिल्व्हेनिया रुग्णालयात नेण्यात आले. इतर तीन जणांना पेन प्रेस्बिटेरियन मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले. अमेरिकेत अलीकडच्या काळात गोळीबाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 25 मे रोजी टेक्सासमधील एका शाळेत झालेल्या गोळीबारात 19 विद्यार्थ्यांसह 23 जणांचा मृत्यू झाला होता.