फिलाडेल्फियामध्ये भीषण दुर्घटना, इमारतीला लागलेल्या आगीत 7 मुलांसह 13 जणांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 01:11 PM2022-01-06T13:11:19+5:302022-01-06T13:11:26+5:30
अग्निशमन दलाने अवघ्या 50 मिनिटांत आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत अनेकांचा मृत्यू झाला होता.
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या पूर्वेकडील फिलाडेल्फिया शहरात स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. फिलाडेल्फियाच्या डाउनटाउनमधील N23rd स्ट्रीटच्या 800 ब्लॉकवरील तीन मजली घराला भीषण आग लागली. या घटनेत 7 मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला.
फिलाडेल्फिया अग्निशमन विभागाचे सांगितल्यानुसार, आग विझली असतानाही इमारतीच्या आतून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. मृतांव्यतिरिक्त अन्य दोघांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आग विझल्यानंतरही अनेक अग्निशमन ट्रक घटनास्थळी उभ्या असलेल्या दिसल्या. सध्या अग्निशमन दल जळालेल्या इमारतीत वाचलेल्यांचा शोध घेत आहेत. ही इमारत फिलाडेल्फिया सार्वजनिक गृहनिर्माण प्राधिकरणाची आहे.
अवघ्या 50 मिनिटांत मृत्यू
इमारतीला आग लागल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याचे कारण तेथे बसविण्यात आलेल्या स्मोक डिटेक्टरमध्ये बिघाड झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे इमारतीत उपस्थित असलेल्या लोकांना वेळेत आगीची सूचना मिळू शकली नाही. इमारतीत चार स्मोक डिटेक्टर असून चारही सदोष असल्याचे उपायुक्त मर्फी यांनी सांगितले.
आगीची माहिती मिळताच स्थानिक वेळेनुसार सकाळी 6.40 वाजता अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी 50 मिनिटांत आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत 7 मुलांसह 13 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. बहुतेक मृत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अडकले होते. तर, इमारतीत अडकलेले 8 जण वेळेत बाहेर आल्याने त्यांचा जीव वाचला.
इमारतीत दोन कुटुंबातील 26 लोक होते
फिलाडेल्फिया सार्वजनिक गृहनिर्माण प्राधिकरणाचे अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत दोन कुटुंबातील 26 लोक राहतात. इमारतीची शेवटची आग तपासणी मे 2021 मध्ये करण्यात आली होती आणि त्यावेळी 6 स्मोक डिटेक्टर चालू स्थितीत होते. सध्या या आगीचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे.