ट्रम्प आणि ओबामा 2028 मध्ये आमने-सामने येणार? अमेरिकन राजकारणात चर्चेला उधाण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 22:22 IST2025-04-01T22:22:09+5:302025-04-01T22:22:47+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्याने 2028 च्या निवडणुकीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

America Politics: Will Donald Trump and Barack Obama face off in 2028? A debate has been sparked in American politics | ट्रम्प आणि ओबामा 2028 मध्ये आमने-सामने येणार? अमेरिकन राजकारणात चर्चेला उधाण...

ट्रम्प आणि ओबामा 2028 मध्ये आमने-सामने येणार? अमेरिकन राजकारणात चर्चेला उधाण...

America Politics: डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा सत्ते आल्यापासून अमेरिकेतून दररोज नवनवीन बातमी समोर येत आहे. आता अमेरिकेच्या राजकारणात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि बराक ओबामा 2028 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे राहतील का? अशी चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू होण्याचे कारण म्हणजे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आलेला एक प्रश्न!

ट्रम्प यांना विचारण्यात आले की, त्यांना बराक ओबामा यांच्याविरोधात निवडणूक लढवायला आवडेल का? यावर ट्रम्प यांनी हसत उत्तर दिले, 'मला मजा येईल!' त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, आता 2028 ची निवडणूक ट्रम्प विरुद्ध ओबामा यांच्यात ऐतिहासिक लढत ठरू शकते का, अशी अटकळ बांधली जात आहे.

ओबामांच्या संभाव्य पुनरागमनावर चर्चा
बराक ओबामा 2008 आणि 2012, सलग दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिले आहेत. 2024 च्या निवडणुकीत त्यांनी कमला हॅरिस यांच्यासाठी पडद्यामागून एक धोरणात्मक भूमिका बजावली होती.

आधी अशीही चर्चा सुरू होती की, त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची आहे, बायडेन यांच्या माघारीनंतर कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाने उमेदवारी दिली. पण, ट्रम्प यांनी त्यांचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा अमेरिकेची सत्ता काबीज केली. आता प्रश्न असा आहे की, ट्रम्प तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर ओबामा त्यांचा सामना करतील का?

ट्रम्प यांच्या या विधानाने चर्चेला उधाण 
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच संविधानाच्या 22 व्या दुरुस्तीवर प्रश्न उपस्थित केले होते. यानुसार, अमेरिकेत कोणत्याही व्यक्तीला दोनपेक्षा जास्त वेळा राष्ट्राध्यक्ष होता येत नाही. यावर ट्रम्प म्हणाले होते की, 'लोक म्हणतात की, यात काही मार्ग आहेत, पण मी अजून यावर फारसा विचार केलेला नाही.' या विधानानंतर 2028 मध्ये तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी ट्रम्प यांना काही कायदेशीर मार्ग सापडू शकतो, अशी अटकळ सुरू झाली आहे. जर ही दुरुस्ती अथवा बदल केला गेला, तर बराक ओबामा यांचाही तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

ट्रम्प विरुद्ध ओबामा 
2028 मध्ये ट्रम्प आणि ओबामा यांच्यात लढत झाली, तर ती अमेरिकन राजकारणाच्या इतिहासातील सर्वात मोठी निवडणूक लढत ठरू शकते. ट्रम्प आणि ओबामा हे दोघेही अत्यंत लोकप्रिय नेते आहेत, ज्यांना त्यांच्या कट्टर समर्थकांचा मजबूत आधार आहे.

ट्रम्प यांचा प्रवास

2016: हिलरी क्लिंटन यांचा पराभव करुन पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले.
2020: जो बायडेन यांच्याकडून पराभव झाला.
2024: कमला हॅरिसचा पराभव करून पुन्हा राष्ट्रपती बनले.

ओबामा यांचा प्रवास
2008: जॉन मॅककेन यांचा पराभव करुन अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.
2012: मिट रोमनी यांचा पराभव करुन दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले.
2016-2024: सक्रिय राजकारणापासून दूर राहिले, परंतु डेमोक्रॅटिक पक्षात प्रभाव राखला.

अमेरिकेचे राजकारण बदलणार?
ट्रम्प आणि ओबामा दोघांनीही तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी घटनात्मक बदलाची शक्यता तपासली, तर ते अमेरिकेचे राजकीय परिदृश्य पूर्णपणे बदलू शकते. रशियामध्ये व्लादिमीर पुतिन आणि चीनमध्ये शी जिनपिंग यांनी घटनात्मक दुरुस्त्या करून अमर्याद कार्यकाळाची व्यवस्था केली आहे. भारतामध्येही निवडणूक लढवण्यासाठी संविधानात वयोमर्यादा आखून दिलेली नाही. 

दरम्यान, शांततापूर्ण सत्ता हस्तांतरणाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल अमेरिकेने नेहमीच अभिमान बाळगला आहे. परंतु जर ट्रम्प आणि ओबामा 2028 मध्ये एकमेकांना सामोरे गेले, तर ते अमेरिकन लोकशाहीसाठी एक नवीन युग ठरू शकते. आता ही फक्त चर्चाच राहणार की, यात काही बदल होणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

Web Title: America Politics: Will Donald Trump and Barack Obama face off in 2028? A debate has been sparked in American politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.