"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 03:49 PM2024-05-18T15:49:49+5:302024-05-18T15:51:53+5:30
US India, Vibrant Democracy: भारताशी अमेरिकेचे राजकीय संबंध अधिक दृढ होत आहेत, असेही व्हाईट हाऊसचे सल्लागार जॉन किर्बी म्हणाले.
US India, Vibrant Democracy: भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हटले जाते. देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सात टप्प्यात होणाऱ्या या मोठ्या निवडणुकीचे जगभरातून कौतुक होताना दिसत आहे. अमेरिका सहसा भारतीय धोरणांवर टीका करताना दिसत असते. परंतु, आता व्हाईट हाऊसने भारतात सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल भारतातील लोकांचे कौतुक केले. तसेच, जगात भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही नाही, असेही विधान केले आहे.
व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा, दळणवळण सल्लागार जॉन किर्बी (White House national security communications advisor John Kirby ) यांनी भारतीय निवडणुकांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रतिक्रिया दिली, "भारतीय लोकशाही हे जिवंतपणाचे उदाहरण आहे. हजारो उमेदवारांमधून 545 खासदार निवडण्यासाठी भारतातील 969 दशलक्षाहून अधिक लोक 10 लाख मतदान केंद्रांवर त्यांच्या मताधिकाराचा वापर करत आहेत. देशातील या निवडणुकीत 2,660 नोंदणीकृत राजकीय पक्ष सहभागी होतात, ही लोकशाहीतील अतिशय मोठी आणि महत्त्वाची बाब आहे."
"पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध दृढ झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ झाले आहेत. भारताशी आमचे संबंध खूप जवळचे आहेत आणि अधिकच घट्ट होत आहेत. विविध नवीन उपक्रम सुरू करणे, महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर संयुक्तपणे काम करणे आणि इंडो-पॅसिफिक क्वाडचा विस्तार करणे अशा कार्यांमध्ये भारत एक महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो. यातून केवळ लष्करी सामर्थ्य किंवा व्यापारच नव्हे तर दोन्ही देशांमधील संस्कृतीची देवाणघेवाणही होताना दिसते," असेही किर्बी यांनी आवर्जून सांगितले.