...अन् डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "2024 ला मी पुन्हा येईन; चार वर्षांनी भेटू"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 01:16 PM2020-12-03T13:16:50+5:302020-12-03T13:25:40+5:30
Donald Trump And US Election : हॉलीडे पार्टीमध्ये आलेल्या पाहुण्यांना संबोधित करताना ट्रम्प यांनी चार वर्षांनंतर पुन्हा मी तुमच्या भेटीला येईन असं म्हटलं आहे.
वॉशिंग्टन - डेमोक्रॅटिक पार्टीचे ज्यो बायडन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. ट्रम्प यांच्या पराभवाने तब्बल 128 वर्षे जुना विक्रमही मोडला आहे. यानंतर आता ट्रम्प यांनी एका हॉलीडे रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानावरुन ते पुन्हा एकदा 2024 ची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
हॉलीडे पार्टीमध्ये आलेल्या पाहुण्यांना संबोधित करताना ट्रम्प यांनी चार वर्षांनंतर पुन्हा मी तुमच्या भेटीला येईन असं म्हटलं आहे. त्यामुळे याच विधानाने ट्रम्प यांनी आता थेट 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. "ही चार वर्षे खूपच छान होती" असं देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाबद्दल बोलताना म्हटलं आहे. या पार्टीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय समितीमधील अनेक सदस्य उपस्थित होते.
"20 जानेवारी 2024 रोजी निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार"
"आम्ही प्रयत्न करत आहोत की आम्हाला आणखीन चार वर्षे सेवेसाठी मिळावेत. म्हणूनच मी तुम्हाला भेटण्यासाठी चार वर्षांनंतर पुन्हा येईन" असं म्हटलं आहे. एनबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प हे 20 जानेवारी 2024 रोजी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहे. यासंदर्भात ट्रम्प यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत चर्चाही केली आहे. मागील आठवड्यामध्ये ट्रम्प यांनी आपले वकील 2020 चे निकाल बदलू शकले नाहीत तर आपण 2024 ची निवडणूक लढू असं म्हटलं होतं. ज्यो बायडन राष्ट्राध्यक्ष झाले असले तरी पुढील काळात प्रसारमाध्यमांमध्ये ट्रम्प यांची चलती असेल असा ट्रम्प समर्थकांचा अंदाज आहे.
"2024 ची निवडणूक लढवली तर 66 टक्के रिपब्लिकन मतदार करतील मतदान"
सेव्हन लेटर इनसाइड नावाच्या एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ट्रम्प यांनी 2024 ची निवडणूक लढवली तर 66 टक्के रिपब्लिकन मतदार त्यांना मतदान करतील असं दिसून आलं आहे. मॉर्निंग-कंसल्ट-पोलिटिकोच्या सर्वेक्षणामध्ये 54 टक्के रिपब्लिकन मतदारांनी पक्षाकडून निवडण्यात येणाऱ्या उमेदावाराच्या निवडीमध्ये ते प्राथमिक उमेदवार म्हणून ट्रम्प यांच्या बाजूने मत देतील असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.