पाकला लष्करी कारवाईसाठी हवी अमेरिकेकडून मदत
By admin | Published: February 20, 2015 02:14 AM2015-02-20T02:14:08+5:302015-02-20T02:14:08+5:30
पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या आपल्या लष्करी कारवाईसाठी अमेरिकेकडे आर्थिक मदत मागितली आहे. या कारवाईसाठी एक अब्ज ३० कोटी डॉलरचा खर्च येणार आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या आपल्या लष्करी कारवाईसाठी अमेरिकेकडे आर्थिक मदत मागितली आहे. या कारवाईसाठी एक अब्ज ३० कोटी डॉलरचा खर्च येणार आहे.
लष्करी कारवाईच्या प्रगतीची माहिती अमेरिकेला देताना अर्थमंत्री इशाक दार यांनी बुधवारी अमेरिकन सिनेटच्या आर्मड् सर्व्हिसेस समितीचे डेमोक्रॅटिक सदस्य जॅक रीड यांची भेट घेतली. यावेळी अमेरिकेचे राजदूत रिचर्ड ओल्सनही उपस्थित होते.
उत्तर वझिरीस्तानात गेल्या वर्षी जूनमध्ये ही लष्करी कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईसह सुरक्षेच्या अन्य मुद्यांवरही यावेळी चर्चा झाली. दार म्हणाले की, सध्याची लष्करी कारवाई आणि अंतर्गतरीत्या विस्थापित झालेल्या लोकांच्या मदतीसाठीचा खर्च ४० कोटी डॉलरवर गेला आहे. (वृत्तसंस्था)
मदरशांवर कारवाई करा
इस्लामाबाद : मशिदींवर सतत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दहशतवाद आणि अतिरेकी कारवायांमध्ये गुंतलेल्या मदरशांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
बलुचिस्तान अॅपेक्स समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलताना शरीफ यांनी दहशतवादी व अतिरेकी संघटनांवर कठोर उपाय केले जातील, असे सांगितले. दक्षिण- पश्चिम प्रांतातील दहशतवादाला निपटून काढण्यासाठी या समितीची स्थापना झाली आहे.