अमेरिका पुन्हा हादरली! टेक्सासमध्ये शाळेत माथेफिरूच्या गाेळीबारात 21 ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 06:52 AM2022-05-26T06:52:08+5:302022-05-26T06:52:45+5:30

टेक्सासमध्ये शाळेत माथेफिरूचा गाेळीबार, इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून अर्ध्या तासात निर्घृण कृत्य, स्वतःच्या आजीलाही केले ठार

America shakes again! | अमेरिका पुन्हा हादरली! टेक्सासमध्ये शाळेत माथेफिरूच्या गाेळीबारात 21 ठार

अमेरिका पुन्हा हादरली! टेक्सासमध्ये शाळेत माथेफिरूच्या गाेळीबारात 21 ठार

Next

ह्युस्टन : अमेरिकेतील टेक्सास राज्यातल्या उवाल्डे शहरातील प्राथमिक शाळेत १८ वर्षे वयाच्या एका माथेफिरूने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १९ विद्यार्थ्यांसह २१ जण ठार झाले. मृतांमध्ये दोन शिक्षकांचाही समावेश आहे. मृतांमध्ये हे ५ ते ११ वर्षे वयोगटातील विद्यार्थी आहेत. जखमी विद्यार्थ्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत हल्लेखोर ठार झाला. हा हल्ला करण्याच्या अर्धा तास आधी त्याने इन्स्टाग्रामला दोन रायफलसह पोस्ट टाकली होती. त्यावर ‘मी हे करणार आहे’ असे लिहिले होते. धक्कादायक म्हणजे हल्ला करण्याआधी त्याने स्वतःच्या आजीला गोळ्या घातल्या.   

त्याच्या या हिंसक कृत्यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पाेलीस याचा तपास करत आहेत.

मृतांमध्ये ५ ते ११ वर्षे वयाच्या बालकांचा समावेश असून, त्यांच्या पालकांचा आक्रोश हेलावून टाकणारा हाेता.

ओक्साबोक्शी रडत होते पालक
शाळेत गोळीबार झाल्याचे कळताच तेथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी धाव घेतली. आपला मुलगा जीवंत आहे की मृत्यूमुखी पडला याची चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. मृतांची नावे जसजशी समोर येऊ लागली तसतसे आक्रोश वाढू लागला होता. पालक ओक्साबोक्शी रडत होते. 

चार दिवस दुखवटा
या घटनेनंतर संपूर्ण अमेरिका हादरला आहे. मृतांना श्रद्धांजली म्हणून अमेरिकेत चार दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. 

२०१२ ची पुनरावृत्ती
अमेरिकेतील न्यू टाऊन येथील शाळेतही २०१२ साली असाच गोळीबार झाला होता. त्यात २० चिमुकल्यांसह २६ जणांचा मृत्यू झाला होता.

या हत्याकांडाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी अमेरिकेतील सरकारी, लष्करी इमारती, युद्धनौका यांच्यावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आले. 

शाळेत होणाऱ्या गोळीबारांच्या घटना रोखण्यासाठी शिक्षकांनाही बंदुकांचे परवाने द्या.
 केन पिक्सॉन, ॲटर्नी जनरल, टेक्सास

शाळेतील हत्याकांडामुळे आपल्याला ज्या वेदना झाल्या आहेत, त्यांचे रूपांतर बलाढ्य बंदूकधारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्याच्या कृतीमध्ये करूया.
जो बायडेन, राष्ट्राध्यक्ष 

 

Web Title: America shakes again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.