सीरियातील संघर्षात अमेरिकेने पडू नये, कारण...; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 08:34 IST2024-12-08T08:31:54+5:302024-12-08T08:34:31+5:30
Syria Civil War: सीरियामध्ये गृहयुद्ध उफाळून आले असून, बंडखोरांनी काही शहरांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यावर आता अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे.

सीरियातील संघर्षात अमेरिकेने पडू नये, कारण...; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
Donald TrumP Syria News: सीरियाची राजधानी दमास्कसवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न बंडखोरांकडून सुरू झाले असून, परिस्थिती अस्थिर बनली आहे. दमास्कसच्या आजूबाजूच्या गावांवर बंडखोरांनी ताबा मिळवला असून, सीरियात गृहयुद्धाची ठिणगी पडली आहे. यावर अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दूर राहण्याची भूमिका घेतली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी भूमिका मांडता म्हटले की, अमेरिकेने सीरियातील संघर्षामध्ये पडू नये, जिथे बंडखोर राष्ट्रपती बशर अल असद यांच्या सरकारला धमकी देत आहेत.
सीरिया अमेरिकेचा मित्र नाही
"सीरिया एक समस्याग्रस्त देश आहे. पण, आमचा मित्र नाहीये. अमेरिकेला याच्याशी काही देणं घेणं नसलं पाहिजे. ही आमची लढाई नाहीये. हे चालू द्याव. यात सहभागी होऊ नये", असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
रशिया असदचा (सीरियाचे राष्ट्राध्यक्ष) सहकारी आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धात अडकला आहे. त्यामुळे असे वाटतेय की, सीरियाच्या माध्यमातून हा मार्च रोखण्यात अपयशी ठरत आहे. एक असा देश ज्याचे त्यांनी अनेक वर्ष संरक्षण केलं, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
सीरियात ९०० अमेरिकन सैनिक
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले, "जर रशियाला सीरियापासून वेगळं केलं गेलं, तर प्रत्यक्षात त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट होऊ शकते."
अमिरेकेचे ९०० सैनिक सीरियात असून, बहुतांश सैनिक उत्तर पूर्व भागात आहेत. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढू नये म्हणून त्यांना तिथे तैनात करण्यात आले आहे.
अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे २०१८ मध्ये अशी घोषणा केली होती की, अमेरिकन सैन्य माघारी बोलवण्याची त्यांची इच्छा आहे. कारण इस्लामिक स्टेट पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. पण, त्यांनी तसे केले नाही, कारण त्यांच्या सल्लागारांनी इशारा दिला होता की, अमेरिकन सैन्याच्या माघारीमुळे पोकळी निर्माण होईल, जी इराण आणि रशिया भरतील.