हुथी बंडखोरांवर अमेरिकेचा कहर सुरूच, येमेनच्या राजधानीत जोरदार हवाई हल्ले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 17:55 IST2025-04-08T17:54:45+5:302025-04-08T17:55:41+5:30
हुथी गटाच्या अल-मसिरा टीव्हीने आणि स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने मंगळवारी उत्तर येमेनमधील अनेक हुथी ठिकानांना लक्ष्य करत २२ हवाई हल्ले केले.

हुथी बंडखोरांवर अमेरिकेचा कहर सुरूच, येमेनच्या राजधानीत जोरदार हवाई हल्ले
येमेनची राजधानी असलेल्या सनाच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील हुथी बंडखोरांच्या ठिकानांवर अमेरिकेचे हल्ले सुरूच आहेत. हुथी गटाच्या अल-मसिरा टीव्हीने आणि स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने मंगळवारी उत्तर येमेनमधील अनेक हुथी ठिकानांना लक्ष्य करत २२ हवाई हल्ले केले.
अमेरिकेने हे हवाई हल्ले राजधानी सनाच्या पूर्व आणि दक्षिण भागात, लाल सागरातील कामरान बेट आणि तेल समृद्ध मारिब प्रांतातील उत्तर आणि दक्षिण भागात केले. या हल्ल्यात अद्याप कसल्याही प्रकारची जीवितहाणी झाल्याची माहिती नाही. मात्र, स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हल्ले मोठे आणि शक्तिशाली होते.
रविवारच्या हल्ल्यांत चार बालकांचा मृत्यू -
तत्पूर्वी, सनामध्ये रविवारी रात्री झालेल्या अमेरिकेच्या हल्ल्यात चार बालकांचा मृत्यू झाला होता. तर 25 जण जखमी झाले होते. यापूर्वी, "आपण इस्रायलमधील तेल अवीव येथील 'लष्करी टार्गेटवर' ड्रोन हल्ला केला होता. तसेच, लाल समुद्रात दोन अमेरिकन युद्धनौकांवर क्रूझ क्षेपणास्त्रे डागली होती, असा दावा हुथी गटाने केला होता.
येमेनमधील लोकांवर होत असलेल्या अत्याचाराला उत्तर -
हुथी सैन्य प्रवक्ता याह्या सरिया यांनी अल-मसीरा टीवीवर प्रसारित करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही जाफा ड्रोनच्या सहाय्याने तेल अवीवमधील एका लष्करी टार्गेटवर कारवाई केली. तसेच, आमच्या नौदलाने आणि हवाई दलाने लाल समुद्रात दोन अमेरिकन जहाजांना लक्ष्य करून अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून संयुक्त लष्करी कारवाई केली. हे हल्ले, येमेनमधील लोकांविरूद्ध सुरू असलेले अमेरिकेचे आक्रमण आणि अत्याचाराविरोधात करण्यात आले आहेत."