इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी अन् औषधे...ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफमुळे तुमच्यावर काय परिणाम पडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 21:38 IST2025-04-03T21:38:08+5:302025-04-03T21:38:45+5:30
America Tariff : भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या प्रत्येक वस्तुवर अमेरिकेने 26 टक्के शुल्क लादले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी अन् औषधे...ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफमुळे तुमच्यावर काय परिणाम पडणार?
America Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के शुल्क लादले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकन बाजारात भारतीय वस्तू 26 टक्क्यांनी महागणार आहेत. यामुळे भारतीय उद्योगपतींना अमेरिकन उद्योगपतींशी करार करणे कठीण होणार आहे. या टॅरिफमुळे भारतीय निर्यात महाग होईल, ज्यामुळे भारतीय उत्पादनांची अमेरिकन बाजारपेठेत स्पर्धा करण्याची क्षमताही कमी होऊ शकते.
भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर 26 टक्के शुल्क लावण्यात आला आहे. आपल्या टॅरिफ धोरणाची घोषणा करताना अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, भारत खूप कठीण देश आहे. पीएम मोदींचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले की, मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत. मी त्यांना सांगितले की, तुम्ही आम्हाला योग्य वागणूक देत नाही. दरम्यान, ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के शुल्क लादले असले तरी, भारताने मात्र अमेरिकेवर 52 टक्के शुल्क लादले आहे.
भारताने 52 टक्के टॅरिफ लादल्यामपळेच, ट्रम्प यांनी 26 टक्के शुल्क लादले आहे. दरम्यान, ट्रम्प यांना व्यापार आणि इमिग्रेशनवर सवलत देऊनही भारताला हा मोठा धक्का बसला आहे. नवीन दरांमुळे इलेक्ट्रॉनिक्स, रत्ने आणि कपडे आणखी महाग होतील. मात्र, औषध उद्योगाला यातून सूट देण्यात आली आहे.
कोणत्या देशावर किती कर?
अमेरिकेने भारतीय आयातीवरील 26 टक्के, युरोपीय युनियनवर वर 20 टक्के, जपान 24 टक्के आणि दक्षिण कोरियावर 25 टक्क्यांपेक्षा जास्त कर लादला आहे. मात्र, हे प्रमाण चीनच्या 54 टक्के आणि व्हिएतनामच्या 46 टक्क्यांपेक्षा कमी आहे. अमेरिकेची भारतासोबतची व्यापार तूट 46 अब्ज डॉलर्स आहे. या समस्येचे निराकरण होईपर्यंत टॅरिफ चालू ठेवावे, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. ट्रम्प प्रशासनाला खूश करण्यासाठी भारत 23 अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन आयातीवरील शुल्कात कपात करू शकतो.