डोनाल्ड ट्रम्प ॲक्शनमोडवर! राष्ट्राध्यक्ष होताच ५३८ बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक; एका दहशतवाद्यालाही केले डिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 15:16 IST2025-01-24T15:15:34+5:302025-01-24T15:16:55+5:30
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होताच ॲक्शनमोडवर आले आहेत. आतापर्यंत ५३८ बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाई केली.

डोनाल्ड ट्रम्प ॲक्शनमोडवर! राष्ट्राध्यक्ष होताच ५३८ बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक; एका दहशतवाद्यालाही केले डिपोर्ट
दोन दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. आता दुसऱ्याच दिवशी ट्रम्प अॅक्शनमोडवर आले आहेत. ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कारावाईक सुरू केली आहे. गुरुवारी अमेरिकेत शेकडो बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक करून हद्दपार करण्यात आले.
"योगी आदित्यनाथ यांच्या बोलण्याशी मी सहमत", अरविंद केजरीवाल यांचा अमित शाह यांचं नाव घेत टोला!
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, अमेरिकन अधिकाऱ्यांनी लष्करी विमानांचा वापर करून ५३८ बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक केली आहे आणि शेकडो लोकांना हद्दपार केले आहे. एका संशयित दहशतवाद्यालाही अटक करण्यात आली आहे.
"ट्रम्प प्रशासनाने ५३८ बेकायदेशीर स्थलांतरित गुन्हेगारांना अटक केली आहे, यात एक संशयित दहशतवादी, ट्रेन डी अरागुआ टोळीचे चार सदस्य आणि अल्पवयीन मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांसाठी दोषी आढळलेल्या असंख्य बेकायदेशीर स्थलांतरितांचा समावेश आहे, असंही त्या म्हणाल्या.
ही फक्त झलक आहे
कॅरोलिन लोविट म्हणाल्या, "ट्रम्प प्रशासनाने लष्करी विमानांद्वारे शेकडो बेकायदेशीर स्थलांतरित गुन्हेगारांना हद्दपार केले. इतिहासातील सर्वात मोठी हद्दपारीची कारवाई सुरू आहे. आश्वासने पाळली गेली." व्हाईट हाऊसने पुढे म्हटले आहे की, आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी सरकार काय करत आहे याची ही एक छोटीशी झलक आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर लगेचच अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पहिल्यांदा, त्यांनी बायडेन प्रशासनाचे ७८ निर्णय रद्द केले. तर दुसरीकडे अमेरिका-मेक्सिको सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली. याशिवाय, ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या सीमेवर पुन्हा भिंत बांधण्याची घोषणा केली.
अमेरिकेच्या संरक्षण विभागानेही याबाबत घोषणा केली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या इमिग्रेशन आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी दक्षिण सीमेवर अतिरिक्त १,५०० सैन्य पाठवतील. तेथे आधीच सुमारे २,५०० अमेरिकन नॅशनल गार्ड आणि राखीव दल आहेत. कोणते सैनिक किंवा तुकड्या जातील हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.