जगप्रसिद्ध व्हिडीओ साइट Youtube ने त्यांचा लोगो काळा केला, जाणून घ्या काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 08:30 AM2020-06-01T08:30:28+5:302020-06-01T08:38:39+5:30
या घटनेच्या निषेधार्थ हजारो लोक अमेरिकेत रस्त्यावर उतरुन प्रदर्शन करत आहेत, त्याला युट्यूबनेही समर्थन दिलं आहे.
नवी दिल्ली – अमेरिकेच्या मिनेसोटा येथे झालेल्या घटनेमुळे सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ जगप्रसिद्ध व्हिडीओ स्ट्रीमिंग साइट युट्यूबने काळ्या रंगाचा लोगो ट्विटरवर ठेवला आहे. अमेरिकेच्या मिनेसोटामध्ये पोलिस अधिकाऱ्यांनी मूळ आफ्रिकन असलेल्या माणसाला गुडघ्यामध्ये दाबून मारुन टाकलं. अनेकदा या व्यक्तीने त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं विनवणी केली तरीही पोलिसांचे मन पिळवटलं नाही.
या घटनेच्या निषेधार्थ हजारो लोक अमेरिकेत रस्त्यावर उतरुन प्रदर्शन करत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत ४ पोलिसांना निलंबित केले आहे. याच घटनेच्या विरोधात युट्यूबनेही ट्विटरवर आपला लोगो ब्लॅक केला आहे. युट्यूबने ट्विटरवर म्हटलं आहे की, आम्ही वर्णभेद आणि हिंसाचाराच्या विरोधात एकीमध्ये उभे आहोत. जेव्हा आमच्या सदस्यांना त्रास होतो तेव्हा आम्हालाही याचा त्रास सहन करावा लागतो.
We stand in solidarity against racism and violence. When members of our community hurt, we all hurt. We’re pledging $1M in support of efforts to address social injustice.
— YouTube (@YouTube) May 30, 2020
या घटनेचा निषेध करण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. लोक मृत जॉर्ज फ्लॉयडचा मास्क घालून रस्त्यावर प्रदर्शन करीत आहेत. या घटनेवर कारवाई करत चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, मृतक जॉर्ज फ्लॉयडवर बनावट असल्याचा आरोप होता. यासंदर्भात पोलिसांनी त्याला घेराव घातला व गाडीतून खाली उतरण्याचे आदेश दिले. बाहेर पडताच जॉर्जने पोलीस अधिकाऱ्यांसोबत धक्काबुक्की केली. याला प्रत्युत्तर देत पोलिसांनी जोर्जला बेड्या घालून जमिनीवर पाडले, यानंतर एक पोलिसाने जॉर्जला त्याच्या गुडघ्यामध्ये दाबून धरले, यामध्ये त्याचा श्वास बंद पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, जॉर्ज याच्या मृत्यूनंतर सुरू झालेली निदर्शने मिनी पोलीस क्षेत्राच्या बाहेरही पसरली. अमेरिकेत सुरू असलेला हिंसाचार थांबलेला नाही. निदर्शकांनी सेंट पॉल मार्गावर लुटमार व जाळपोळ केली, तसेच ते यापूर्वी हिंसक निदर्शने झालेल्या जागीही गेले, जेथे आधीच मोठे नुकसान झालेले होते. आंदोलनकर्त्यांनी एका पोलीस ठाण्याला आग लावली. अमेरिकेच्या वेगवेगळया भागांमध्ये या आंदोलनाचे लोण पसरत आहे. याप्रकरणी आतापर्यंत अमेरिकेतील १४०० जणांना अटक करण्यात आली आहे.
लॉस एंजिल्स, फिलाडेल्फियासह १६ राज्यांतील २५ शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या काही गाड्याही आंदोलनकर्त्यांनी जाळल्या आहेत. तसेच १३ पोलीस यामध्ये जखमी झाले आहेत. आतापर्यंत तब्बल १४०० जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रेसिंक्ट पोलीस ठाणे तातडीने रिकामे करण्यात आले. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये निदर्शक पोलीस ठाण्यात घुसताना व इमारतीला आग लावताना दिसत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.