चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 06:32 AM2024-09-23T06:32:52+5:302024-09-23T06:33:03+5:30
२९७ प्राचीन वस्तूंत जैन तीर्थंकरांची कांस्य मूर्तीही
विलमिंगटन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान अमेरिकेने २९७ प्राचीन वस्तू भारताकडे सोपविल्या आहेत. तस्करीच्या माध्यमातून या वस्तू भारताबाहेर नेण्यात आल्या होत्या. भारत-अमेरिका यांच्यात सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने जुलै २०२४ मध्ये सांस्कृतिक संपत्तीविषयक सहकार्य करार झाला होता. त्यानुसार या वस्तू भारताला देण्यात आल्या आहेत. याबद्दल मोदी यांनी बायडेन यांचे आभार मानले. भारताकडे सोपविण्यात आलेल्या या वस्तू इ.स.वी. सनपूर्व २००० ते इ. स. १९०० या काळातील आहेत.
या वस्तूंत वाळू काश्मापासून तयार ११-१२व्या शतकातील अप्सरेची मूर्ती, मध्य भारतात सापडलेली जैन तीर्थंकरांची १५-१६व्या शतकातील कांस्य मूर्ती, ३-४थ्या शतकातील सिरॅमिक फुलदाणी, श्री भगवान गौतम बुद्धांची १५-१६व्या शतकातील उभी मूर्ती, इसवी सनपूर्व २०००-१८०० या काळातील कांस्याची मानवरूपी रचना यांच्यासह अनेक वस्तूंचा समावेश आहे
बायडेन पंतप्रधान मोदींचे नाव विसरले तेव्हा...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आपल्या विसरभोळेपणामुळे चर्चेत असतात. 'क्याड' परिषदेच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव ते विसरले. यावेळी व्यासपीठावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज, जपानचे पंतप्रधन फुमियो किशिदा हेही उपस्थित होते.
कॅन्सरशी संबंधित कार्यक्रमात बायडेन यांना मोदी यांना व्यासपीठावर बोलावण्यासाठी त्यांचे नाव घ्यायचे होते, पण त्यांना नावच आठवेना. अखेर त्यांनी कोणाला आमंत्रित करायचे, असे अधिकाऱ्यांना विचारले. अधिकाऱ्यांनी मोदींकडे इशारा केला. दरम्यान, मोदी खुर्चीवरून उठतात आणि अधिकारी त्यांचे नाव पुकारतात. मोदी बायडेन यांच्याशी हस्तांदोलन करतात. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसले.
बायडेन यांना महाराष्ट्रातील कलाकारांची 'चांदीची रेल्वे'
■ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना हस्तकलेतून साकारलेली प्राचीन रेल्वेची चांदीची प्रतिकृती भेट म्हणून दिली.
■ महाराष्ट्रातील कलाकारांनी ती तयार केली असून शिल्पकलेचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. वाफेवर चालणाऱ्या इंजिनच्या काळातील रेल्वेची ही प्रतिकृती कलात्मकता आणि ऐतिहासिक महत्त्व याचे अफलातून मिश्रण आहे.
■ मोदींच्या वतीने अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बायडेन यांना कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या बॉक्समध्ये ठेवलेली पश्मिना शाल भेट म्हणून देण्यात आली. पश्मिना शाल ही जम्मू-काश्मीरच्या हस्तकलेचा एक समृद्ध वारसा आहे.