वृद्धीविषयक संधी देण्यासाठी अमेरिका करतेय भारतासोबत काम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 03:52 AM2019-08-01T03:52:51+5:302019-08-01T03:52:56+5:30
माईक पॉम्पेव यांचे प्रतिपादन; ट्रम्प प्रशासनाची भारत-प्रशांत रणनीती
वॉशिंग्टन : भारताला आपली अर्थव्यवस्था वृद्धीच्या मार्गावर नेण्यास मदत व्हावी यासाठी अमेरिका भारतासोबत कठोर मेहनत घेत आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेव यांनी केले आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने आखलेल्या भारत-प्रशांत रणनीतीचा हा भाग आहे, असेही पॉम्पेव म्हणाले.
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी तणाव वाढत असतानाच हे वक्तव्य अमेरिकेकडून आले आहे. त्यामुळे याला विशेष महत्त्व असल्याचे जाणकारांनी सांगितले. अमेरिकी उत्पादनांवर भारताने अलीकडेच लावलेले कर अस्वीकारार्ह असल्याचे जाहीर वक्तव्य अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. विकसनशील देशांच्या लाभासाठी अमेरिकेकडून चालविण्यात येणाऱ्या जनरलाईज्ड सिस्टिम आॅफ प्रेफरन्सेस (जीएसपी) कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांच्या यादीतून भारताचे नाव ट्रम्प प्रशासनाने जूनमध्ये काढून टाकले आहे. अमेरिकेने भारताला व्यापारी प्राधान्य लाभ नाकारल्यानंतर भारताने प्रतिकारवाई करीत अमेरिकेच्या २८ वस्तूंवर ५ जून रोजी कर लावले होते. प्रत्याघाती कर लावण्यात आलेल्या वस्तूंत बदाम आणि सफरचंद यांचा समावेश आहे. भारताच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांतील व्यापारी तणाव आणखी वाढला आहे. जीएसपी हा अमेरिकेचा सर्वांत मोठा आणि सर्वांत जुना व्यापारी प्राधान्य कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत विकसनशील देशांतील हजारो वस्तूंना अमेरिकेत करमुक्त प्रवेश दिला जातो. अमेरिकेने
भारताला या कार्यक्रमातून बाहेर काढून ही कर सवलत नाकारली आहे.
टीका आणि चर्चाही
च्पॉम्पेव यांचे वक्तव्य येण्याच्या काही आठवडे आधीच अमेरिकेचे दक्षिण आशिया आणि मध्य आशिया या भूभागासाठीचे सहायक व्यापार प्रतिनिधी क्रिस्टोफर विलसन यांनी नवी दिल्लीत वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. या चर्चेत कर आणि शुल्क याविषयीचे मुद्दे प्रमुख होते, असे सूत्रांनी सांगितले.