अमेरिका... चीन... तैवान, तिरंग्याची सर्वत्र शान!, विविध देशांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 07:22 AM2022-08-16T07:22:50+5:302022-08-16T07:23:01+5:30
Independence Day : जगभरात स्थायिक झालेल्या भारतीयांनीही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला.
नवी दिल्ली : देशभरात ७५वा स्वातंत्र्य दिन धूमधडाक्यात साजरा होत असतानाच परदेशातही तिरंगा डौलाने फडकला. विविध देशांतील भारतीय उच्चायुक्त कार्यालयांत स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जगभरात स्थायिक झालेल्या भारतीयांनीही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला.
सिंगापूरमध्ये भारतीय नौदलाच्या ताफ्यातील आयएनएस शरयू हे जहाज दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी तिरंगा फडकावत देशभक्तिपर गीते सादर केली. सिंगापूरमधील भारतीयांनी रस्तोरस्ती तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते.
चीनमध्ये उत्साह
चीनची राजधानी बीजिंगमधील भारतीय दूतावासात राजदूत प्रदीपकुमार रावत यांनी तिरंगा फडकवला.
यावेळी बीजिंगस्थित बहुतांश भारतीय उपस्थित होते. रावत यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा संदेश उपस्थितांना वाचून दाखवला.
गुंआंग्झू प्रांतातीत भारतीय उच्चायुक्तालयाचे उच्चायुक्त शंभू हक्की यांनी स्वलिखित ‘सबसे प्यारा देश मेरा’, हे गाणे सादर केले. अनेक चिनी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जो बायडेन यांनी दिल्या शुभेच्छा
अमेरिकेत भारतीयांचे प्रमाण लक्षणीय असलेल्या शहरांमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हर घर तिरंगा ही मोहीमही ठिकठिकाणी राबविण्यात आली. बोस्टन, कॅलिफोर्निया, ह्यूस्टन, वॉशिंग्टन या शहरांमध्ये तर उत्साहाचे वातावरण होते. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या.
इंग्लंडच्या पंतप्रधानांचा संदेश
इंग्लंडचे काळजीवाहू पंतप्रधान बोरिस
जॉन्सन यांनी तमाम भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच त्यांच्या ट्विटर अकाउंटवर साबरमती आश्रमातील फोटो पोस्ट करून आठवणींना
उजाळा दिला.
भारताला उज्ज्वल भविष्य असल्याचा संदेशही जॉन्सन यांनी प्रसारित केला.
पूर्व लंडनमधील व्हार्फ बंदरावर आगमन झालेल्या आयएनएस तरंगिणी या जहाजावर तिरंगा फडकविण्यात आला. लंडनमधील भारतीयांनी तिरंगा रॅली काढली होती.
- तैवान, बांगलादेश, नेपाळ, इस्रायल, कॅनडा, मालदीव, श्रीलंका या देशांमध्येही स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.