इस्लामिक स्टेटच्या संशयितांना पकडण्यासाठी अमेरिकी CIA ने दिली टिप
By Admin | Published: January 23, 2016 12:35 PM2016-01-23T12:35:13+5:302016-01-23T12:41:23+5:30
इस्लामिक स्टेटच्या भारतातील दहशतवाद्यांविरोधात राष्ट्रीय तपास पथकाने केलेल्या धडक कारवाईसाठी अमेरिकी गुप्तचर संस्थेने सहाय्य केल्याचे समोर येत आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - इस्लामिक स्टेटच्या भारतातील दहशतवाद्यांविरोधात राष्ट्रीय तपास पथकाने केलेल्या धडक कारवाईसाठी अमेरिकी गुप्तचर संस्थेने सहाय्य केल्याचे समोर येत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकी गुप्तचर संस्थांनी भारतीय सुरक्षा अधिका-यांना इस्लामिक स्टेटच्या भारतातील कारवायांसंदर्भात माहिती पुरवली. अमेरिकी गुप्तचर संस्था इस्लामिक स्टेटशी सबंधित शेकडो इंटरनेट प्रोटोकॉल पत्त्यांवर नजर ठेवून आहेत. सीरिया व इराकमधून जगभरात साधण्यात आलेली संपर्क यंत्रणेवर अमेरिकी गुप्तचरांचे लक्ष असते. याचदरम्यान भारतामध्ये करण्यात आलेल्या संपर्काची माहिती अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना लागली आणि त्यांनी भारताला सहाय्य केल्याचे टाइम्सच्या या वृत्तात म्हटले आहे.
अब्दुल सामी या अल कायदाचा संशयित दहशतवाद्याला दिल्ली पोलीसांनी मेवातमधल्या नूह येथून अटक केली.
भारतात पकडलेल्या अखलाख रेहमानसह ज्या तिघांना अटक करण्यात आले, ते शफी अरमार किंवा युसूफ अल हिंदीच्या संपर्कात होते आणि तो वापरत असलेल्या सर्व्हर व इंटरनेट कनेक्शनवर अमेरिकी गुप्तचरांची नजर होती. अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांनी व्हॉट्स अॅप व फेसबुकच्या माध्यमातून देवाणघेवाण केलेली माहिती मध्येच मिळवण्यात सुरक्षा संस्थांना यश आले आणि या संशयितांना अटक करणे सोपे गेल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी युसूफ व अखलाख यांच्यामध्ये झालेल्या संवादामध्ये ७ कलश रख दो असा संदेश होता. याचा अर्थ सात ठिकाणी बाँबस्फोट घडवा असा होतो. अमेरिकी गुप्तचर संस्थेने ही माहिती भारतीय सुरक्षा अधिका-यांना दिली. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना या माहितीची कल्पना दिली, ज्यानंतर देशभरात विविध ठिकाणी अटकसत्र सुरू करण्यात आले आणि एकाच दिवशी १४ संशयितांना अटक करण्यात आले.
ठाण्याच्या मुंब्रा भागातून इसिस समर्थकांचा म्होरका मुदब्बीर शेख उर्फ आमिर याला तर मुंबईच्या माझगाव भागातून खान महम्मद हुसेन या ३६ वर्षीय व्यावसायिकाला अटक करण्यात आली.
त्यासाठी दिल्ली, बंगळूर, मुंबई व हैदराबादमधल्या स्थानिक पोलीसांना व दहशतवादविरोधी पथकांना सतर्क करून सहाय्य घेण्यात आले. विशेष म्हणजे, कुणाला पकडायचंय याची निश्चित माहिती नव्हती. केवळ नाव आणि राहण्याची जागा या दोनच गोष्टी माहित होत्या. दिल्लीमध्ये कंट्रोल रुम तयार करून तिथून दिलेल्या सूचनांनुसार या धाडी टाकण्यात आल्या आणि संशयितांना अचक करण्यात आले.