ओसामा बिन लादेनला ठार करणारा अमेरिकन कमांडो अटकेत, समोर आलं असं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 06:40 PM2023-08-27T18:40:44+5:302023-08-27T18:41:03+5:30
United State: ओसामा बिन लादेनला गोळ्या घालून ठार करणारा माजी नेव्ही सिल कमांडो रॉबर्ट जे. ओ’नील याला अटक करण्यात आली आहे. या ४७ वर्षीय कमांडोला या आठवड्यात अमेरिकेतील दक्षिणेकडचं राज्य असलेल्या टेक्सासमधील फ्रिस्को शहरातून अटक करण्यात आली आहे.
११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवरवर हल्ला करून हजारो लोकांचा बळी घेणारा कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याला अमेरिकेच्या नेव्ही सिल कमांडोंनी २०११ साली पाकिस्तानमध्ये ठार केले होते. दरम्यान, ओसामा बिन लादेनला गोळ्या घालून ठार करणारा माजी नेव्ही सिल कमांडो रॉबर्ट जे. ओ’नील याला अटक करण्यात आली आहे. या ४७ वर्षीय कमांडोला या आठवड्यात अमेरिकेतील दक्षिणेकडचं राज्य असलेल्या टेक्सासमधील फ्रिस्को शहरातून अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
द डलास मॉर्निंग न्यूजमध्ये झापलेल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, रॉबर्टवर हल्ला करणे, शारीरिक दुखापत करणे, सार्वजनिकपणे नशा करणे आदी गुन्ह्यांखाली खटला दाखल करण्यात आला आहे. मात्र तुरुंगातील रेकॉर्डमध्ये केवळ हल्ल्याचा आरोप सूचिबद्ध करण्यात आला आहे.
फ्रिस्को पोलिसांनी या प्रकरणी अधिक माहिती देण्यास नकार दिला. दरम्यान, ओ’नील याला अटक करण्यात आली त्याच दिवशी सोडण्यात आले. त्यासाठी त्याला ३ हजार ५०० डॉलरचा बाँड भरावा लागला. द न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार ओ’नील एका स्थानिक सिगार लाऊंजमध्ये पॉडकास्ट रेकॉर्ड करण्यासाठी शहरात आले होते. ओ’नील हे सील टीम ६, विशिष्ट्य नेव्ही सील गटाचे माजी सदस्य म्हणून खूप चर्चित आहेत.
ओ’नील हा २०११ मध्ये अमेरिकेने पाकिस्तानमध्ये कारवाई करून ओसामा बिन लादेनला ठार मारले त्या मोहिमेमध्ये सहभागी होता. तसेच ओसामा बिन लादेनला ठार मारण्यामधील आपल्या भूमिकेबाबत केलेल्या दाव्यानंतर तो चर्चेच आला होता. मात्र अमेरिकन सरकारने त्याच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. तसेच त्याचे खंडनही केलेले नाही.