नरेंद्र मोदी मेडिसन स्कवेअर ते अमेरिकन काँग्रेस
By admin | Published: June 8, 2016 02:37 PM2016-06-08T14:37:49+5:302016-06-08T14:54:25+5:30
पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा चौथा अमेरिका दौरा असून, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चा करण्याची ही त्यांची सहावी वेळ आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा चौथा अमेरिका दौरा असून, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चा करण्याची ही त्यांची सहावी वेळ आहे. इतर कुठल्याही देशांपेक्षा मोदी यांचा अमेरिका दौरा नेहमीच चर्चेत असतो. मोदी मुख्यमंत्री होते तेव्हा गुजरात दंगलीचा डाग त्यांच्यावर असल्यामुळे अमेरिकेने त्यांना वारंवार व्हिसा नाकारला होता. मात्र मोदींनी देशाची सूत्रे संभाळल्यानंतर अमेरिकेने भूमिकेत तात्काळ बदल झाला व कालपर्यंत अप्रिय असलेले मोदी अमेरिकेला प्रिय झाले.
वाजपेयी यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिकेची वाढलेली जवळीक मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात अधिक घनिष्ठ झाली. आता मोदींच्या राजवटीतही भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ झाले आहेत. २६ ते ३० सप्टेंबर २०१४ मध्ये मोदींनी अमेरिकेचा पहिला दौरा केला. त्यावेळी न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध मेडीसन स्कवेअरमधील त्यांचे भाषण गाजले होते. मोदींना ऐकण्यासाठी त्यावेळी मेडीसन स्कवेअर खच्चून भरले होते. यावेळी भारतीय कलाकारांनी मोदींच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित केले. पण मोदींच्या पहिल्या दौ-यात प्रचारापलीकडे फार काही निष्पन्न झाले नाही.
२४ ते ३० सप्टेंबर २०१५ दरम्यान मोदींनी अमेरिकेचा दुस-यांदा दौरा केला. या दौ-यात अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीला भेट देणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरेल. गुगल, फेसबुक या कंपन्यांच्या कार्यालयांना भेटी देऊन त्यांच्या सीईओशी चर्चा केली. या कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. गुगलने यावेळी भारतातील पाचशे रेल्वे स्थानकांवर वायफाय सुरु करण्याची घोषणा केली. पण त्या व्यतिरिक्त या दौ-यातून फारसे काही निष्पन्न होताना दिसले नाही.
मोदींचा आताचा चौथा दौरा असून यावेळी त्यांना खास ओबामांनी निमंत्रित केले आहे. मोदींच्या चौथ्या दौ-यातून रणनीतीक दुष्टया भारताच्या हिताचे निर्णय झाले आहेत. भारताचा क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण आणि हस्तांतरण (एमटीसीआर) देशांच्या गटात समावेशाचा मार्ग झाला मोकळा झाला असून, एनएसजीमधील भारताच्या सदस्यत्वालाही अमेरिकेने पाठिंबा दिला आहे.